खास प्रतिनिधी
फलटण/ सोलापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या फलटणमधील निवासस्थानी आज शुक्रवार (ता.16) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास वडूज पोलीस ठाण्याकडील पोलिसांचा मोठा फौजफाटा अचानक धडकला. याने निवासस्थानात खळ् झालं. यासंबंधीची वार्ता वार्यासारखी त्यांच्या फलटणसह सातारा जिल्ह्यातील समर्थकांमध्ये पोचली. तसे समर्थक फलटणमधील त्यांच्या ‘लक्ष्मी’या निवासस्थानी पोचले. मात्र निवासस्थानात कोणालाच प्रवेश दिला गेला नाही. सकाळी साडेदहा वाजता चौकशीसाठी पोचलेले पोलीस दुपारी चार वाजता त्यांच्या निवासस्थानातून बाहेर पडले. तोपर्यंत सर्वत्र खळबळ माजली होती. सर्वत्र एकच चर्चा होती…आता पुढे काय होणार?
दरम्यान रामराजे निंबाळकर यांना पोलिसांनी ‘त्या’ महिलेच्या संदर्भात काही प्रश्न विचारले. तेव्हा बुजुर्ग रामराजेंनी ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका वठविण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत केला. त्यांनी सर्व आरोपांचा इन्कार केला. पण उत्तरे देता देता त्यांना घाम फुटला, असे पोलिस सुत्रांकडून सांगण्यात आले. पोलिसांनी त्यांचा जबाब घेतला. याप्रकरणात आता पोलीस पुढची कोणती कारवाई करणार? याकडे सातारा अन् सोलापूर जिल्ह्यासह उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी प्रकरणात रामराजे निंबाळकर यांचे नाव पोलिस तपासातून समोर आले होते.याप्रकरणात वडूज पोलिसांनी रामराजेंना काही दिवसांपूर्वी समन्स पाठवले होते. वडूज पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, प्रकृती ठीक नसल्याचे कारण देऊन रामराजेंनी वडूज पोलिस ठाण्यात नकार दर्शवला होता. मुंबईत येऊन स्टेटमेंट घेण्याबद्दल सांगितले होते.
मात्र, वडूज पोलिसांनी आज सकाळीच फलटण शहर गाठले. तिथे रामराजे निंबाळकर यांच्या निवास्थानात थेट धडक मारुन पुढे साडेचार तास रामराजे यांची चौकशी करुन जबाब नोंदविला. वडूज पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्यासह या पोलिस ठाण्याचे 9 कर्मचारी आणि स्थानिक फलटण पोलिस ठाण्याकडील 2 अशा एकूण 11 कर्मचार्यांचे पथक रामराजेंच्या चौकशीच्या मोहिमेवर शुक्रवारी होते.
रामराजे म्हणाले,
फक्त राजकीय संबंधातून ‘त्या’ महिलेशी संवाद
मंत्री जयकुमार गोरेंच्या बदनामीचे षडयंत्र वगैरे रचण्यात माझा अजिबात संबंध नव्हता आणि नाही. संबंधित महिलेस आपण ओळखतो. राजकीय संबंधातून तिच्याशी संवाद साधत होतो, तिला नोकरी लावण्यासाठीचे बोलणे झाले होते, असे रामराजे यांनी तपासादरम्यान पोलिसांना सांगितले. ‘त्या’ महिलेस पैसे देऊन आपण बदनामी करण्याबद्दल सांगितले नव्हते, असेही स्पष्टीकरण रामराजेंनी दिले आहे. तीन पानांचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. यामध्ये हा उल्लेख नमूद असल्याचे वडूज पोलिस ठाण्याच्या सुत्रांकडून दैनिक ‘सुराज्य’ला सांगण्यात आले.
मंत्री गोरे म्हणाले,
माझ्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात
अडकले रामराजे
रामराजे यांच्या फलटणमधील निवासस्थानी पोलिस चौकशी धडकले त्यावेळी नामदार गोरे हे सोलापूर दौर्यावर होते. या दरम्यान त्यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, माझ्या बदनामी प्रकरणात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. मोठं षडयंत्र रचण्याचा प्रयत्न केला आहे. राजकीय द्वेष करण्याचा किती प्रयत्न करावेत, याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यांनी अनेक राजकीय नेत्यांना संपवण्याचे काम केले आहे. तसेच, नव्या नेतृत्वाला संपविण्याचे काम त्यांनी केलेले आहे. माझ्याही पाठीशी गेली 17 वर्षांपासून हा संघर्ष होतामी मंत्रिपदाची शपथ घेऊन काम सुरू केल्यानंतर त्यांनी कळस गाठला होता. पण, परिणाम आपण बघितला असेल. काही तरी षडयंत्र करायचं,
त्यातून बदनाम करायचं आणि आपल्या विरोधकांना संपविण्याचा घाट त्यांनी घातला हेाता. अनेकदा असं होतं की जेव्हा आपण दुसर्यासाठी खड्डा खणतो, तेव्हा आपल्यासाठी तो आपोआप तयार होतो. ती परिस्थिती आज निर्माण झाली आहे, असे सांगून माझ्यासाठी खणलेल्या खड्ड्यात रामराजे स्वतः अडकल्याचे गोरे यांनी आयुष्यभर शकुनीमामाचं काम केलं. आता परिस्थिती उलटी झालेली आहे. तसेच, सगळ्याच गोष्टी पुढे आलेल्या आहेत. त्या दोघांच्या (रामराजे आणि संबंधित महिला) संभाषणाचे कॉल रेकॉर्डिंग समोर आलेले आहे. त्यातून अनेक गोष्टी समोर आलेल्या आहेत. षडयंत्र समोर आलं आहे. कशा पद्धतीने प्लॅन होता, पैसे कोणाकडे पाठवायचे, कोणी द्यायचे, हे सर्व पुढे आलेले आहे. या सर्व तपासाच्या अनुषंगाने पोलिस रामराजेंच्या घरी गेलेले असावेत, असा दावाही जयकुमार गोरे यांनी केला.अप्रत्यक्षपणे सांगितले.