अमरावती, 19 मे (हिं.स.)
भाजपच्या कार्यक्रमात भाजप नेत्या माजी खा. नवनित राणा यांनी ‘एकला चलो रे’ ची भाषा वापरल्यानंतर आणखी एक शाब्दिक बाण सुटला. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीवरून अमरावतीचे राजकारण तापायला सुरुवात झालीय. या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि विधानपरिषदेचे आमदार संजय खोडके यांनी रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे. अमरावतीत राणा यांचा पक्ष सोबत असेल तर आम्ही स्वतंत्र निवडणूक लढणार. त्यांच्यासोबत आमचं ताळमेळ बसूच शकत नाही, असे संजय खोडके यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले.
याचबरोबर,भाजपाच्या वतीनं महापालिका निवडणूक स्वतंत्र लढण्याबाबत बोललं जात असताना आमचे नेते अजित पवार यांनीही काल परवा पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढण्यास सज्ज आहोत असं जाहीर केलं आहे. राज्यात सत्तेवर असणाऱ्या महायुतीतील तिन्ही पक्ष जर महापालिका निवडणुकीत एकत्र येत असतील तर, अमरावतीत राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष आमच्यासोबत अजिबात चालणार नाही. ही आमची स्पष्ट भूमिका आहे, असं देखील संजय खोडके यांनी सांगितलं.
इतर मित्र तेढ निर्माण करणारे
भाजपाशी संबंधित इतर घटक संघटना या जाती आणि धर्मातद्वेष निर्माण करणाऱ्या असल्या तरी भाजपा सर्वांना सामावून घेणारा पक्ष आहे. अमरावतीत भाजपाचे इतर मित्र हे दोन धर्मात तेढ निर्माण करणारे आहेत, अशी टीका संजय खोडके केली. तसंच, राणा सोबत असतील तर आम्ही भाजपासोबत युतीचं करणार नाही, असं देखील खोडके म्हणाले.
