कोल्हापूर, २१ मे, (हिं.स.) : कोल्हापूर जिल्ह्यात तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील ८३ वर्षीय वृद्धाला कोल्हापूर महापालिका हद्दीतील त्याच्या घरी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे आणि शाहूवाडी तालुक्यातील ४० वर्षीय महिलांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सुधारत आहे.
महाराष्ट्रात सध्या ५६ सक्रिय रुग्ण आहेत तर तामिळनाडू मध्ये ६६ आणि कर्नाटकात १३ रुग्ण आहेत. सोमवारी मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा मृत्यू झाला, पण डॉक्टरांनी सांगितले की त्यांचा मृत्यू दीर्घकालीन आजारांमुळे झाला.
आशियातील सिंगापूर, हाँगकाँग, चीन आणि थायलंडमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. सिंगापूरमध्ये मेपर्यंत ३ हजार रुग्ण आढळले असून, हाँगकाँगमध्ये जानेवारीपासून ८१ रुग्ण आणि ३० मृत्यू झाले आहेत. चीन व थायलंडमध्येही अलर्ट जारी आहे.
भारतामध्ये सध्या कोरोनाची मोठी लाट नाही. सरकारच्या मते परिस्थिती नियंत्रणात आहे. तरीही, शेजारील देशांतील वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य तज्ञांनी सावधगिरी बाळगण्याचा आणि लस घेण्याचा सल्ला दिला आहे.