मुंबई, 22 मे (हिं.स.)।वानखेडेच्या घरच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध दिमाखदार विजय नोंदवत प्लेऑफ्समधील आपले स्थान पक्के केले आहे.तर दुसरीकडे या सामन्यातील पराभवासह दिल्ली कॅपिटल्सचा यंदाच्या हंगामातील प्रवास संपुष्टात आला आहे.
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने सलग चार सामने जिंकले होते. पण त्यानंतर त्यांची गाडी रुळावरून घसरली. हंगामाची सुरुवात सलग चार विजयासह करून प्लेऑफ्स न खेळू शकणारी दिल्ली कॅपिटल्स ही पहिली टीम ठरलीये. दुसरीकडे मुंबई इंडियन्सच्या संघाने सुरुवातीच्या पराभवाची मालिका ज्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघाविरुद्ध संपवली त्या संघाविरुद्ध दिमाखदार विजय नोंदवत मुंबई इंडियन्सच्या संघाने ११ व्या वेळी प्लेऑफ्समध्ये अगदी थाटात एन्ट्री मारलीये.
अक्षर पटेलच्या अनुपस्थितीत कॅप्टन्सी करणाऱ्या फाफ ड्युप्लेसिस याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. धावफलकावर फक्त २३ धावा असताना रोहित शर्माच्या रुपात मुंबई इंडियन्सच्या संघाने पॉवर प्लेमध्येच पहिली विकेट गमावली होती. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेला विल जॅक्सही माघारी फिरला. रायन रिकल्टन २५ धावा करून परतल्यावर मुंबई इंडियन्सची अवस्था बिकट झाली होती. ५८ धावांवर आघाडीच्या तीन विकेट्स गमावलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघासाठी सूर्यकुमारनं सावरलं.
आधी सूर्यकुमारने तिलक वर्मासोबत डाव सावरला. मग अखेरच्या षटकात नमन धीरचा धमाका पाहायला मिळाला. सूर्यकुमार यादवनं ४३ चेंडूत केलेली नाबाद ७३ धावांची खेळी आणि अखेरच्या षटकात नमन धीरनं ८ चेंडूत केलेल्या २४ धावांच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने दिल्लीसमोर १८१ धावांचे टार्गेट सेट केले होते.या धावसंख्येचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचा संघ १२१ धावांत ऑल आउट झाला.
मुंबई इंडियन्सच्या संघाने सेट केलेल्या धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरुवातच खराब झाली. फाफ ड्युप्लेसिस आणि लोकेश राहुल या भरवशाच्या गड्यांना दिपक चाहर आणि बोल्टनं स्वस्तात माघारी धाडले. मग मुंबईच्या ताफ्यातून मिचेल सँटनरनं तीन विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. त्याच्याशिवाय जसप्रीत बुमराहनंही ३ विकेट्स घेतल्या.