मुंबई, 23 मे (हिं.स.)। २१ मे रोजी सुरू झालेली अकरावीसाठीची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया काही तासांतच तांत्रिक कारणामुळे ठप्प झाली होती. ही प्रवेशप्रक्रिया आता सोमवारी २६ मेपासून सकाळी ११ वाजता सुरू होणार असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली.
अकरावी प्रवेशप्रक्रियेचे नवीन वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. ज्या सॉफ्टवेअर कंपनीला ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यासाठी कंत्राट देण्यात आले होते, त्या कंपनीच्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक अडचण आल्याने २१ मे रोजी सुरू झालेल्या प्रवेशप्रक्रियेत अडथळा आल्याचे विभागातील सूत्रांनी सांगितले.मात्र आता ही प्रवेशप्रक्रिया २६ मे पासून पुन्हा सुरु होणार आहे.
दरम्यान, ग्रामीण भागात गावातल्या गावातच विद्यार्थी अकरावीला प्रवेश घेतात. तसेच १५ जूनपर्यंत ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालय सुरू होतात. मात्र, ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेतील घोळामुळे त्यात आडकाठी येण्याची शक्यता व्यक्त करत येथील प्रवेशप्रक्रिया ऑफलाइन पद्धतीनेच घ्यावी, अशी मागणी कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे सरचिटणीस मुकुंदराव आंधळकर यांनी केली आहे.
अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेच्या नवे वेळापत्रकानुसार २६ मे ते ३ जून रोजी विध्यार्थ्यांना अर्ज प्रक्रिया करावी लागणार आहे.त्यानंतर
५ जून रोजी तात्पुरती गुणवत्तायादी लागेल. ६ ते ७ जून रोजी
विद्यार्थ्यांना हरकती व निराकरण करण्यासाठी वेळ असणार आहे. त्यानंतर ९ जून ते ११ जून रोजी विध्यार्थ्यांचा प्रवेश निश्चिती होईन.आणि ११ ते १८ जून रोजी विद्यार्थ्यांना माध्यमिक विद्यालयात जाऊन प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
