नवी दिल्ली, 24 मे (हिं.स.) – २०२० मध्ये कोरोना महामारीने भारतासह जगाला हादरवून टाकले होते. त्यातून भारताला पुन्हा उभे राहण्यासाठी काही वर्षांचा काळ लोटला. तो काळ सरतो न सरतो तोच पुन्हा कोरोनाच्या नव्या विषाणूचे संकट समोर ठाकले आहे. शुक्रवारी (२३ मे) गुजरात २०, हरियाणा ५, उत्तर प्रदेशात ४ नवीन रुग्ण आढळले. बंगळुरूमध्ये ९ महिन्यांचे बाळ कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. देशभरात आतापर्यंत एकूण ३१२ एक्टिव्ह रुग्ण आहेत, तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस वाढता धोका पाहून आरोग्य मंत्रालयाकडून विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दिल्ली सरकारने म्हटलं आहे की, सर्व रुग्णालयांनी बेड, ऑक्सिजन, औषधे आणि लसींची पूर्ण व्यवस्था करावी. तसेच, रुग्णालयांना प्रत्येक कोरोना पॉझिटिव्ह नमुना जीनोम सिक्वेन्सिंगसाठी लोकनायक रुग्णालयात पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत आणि सर्व संस्था त्यांचे रिपोर्ट दररोज आरोग्य डेटा पोर्टलवर अपलोड करतील. “आतापर्यंत २३ कोरोना रुग्ण आढळले आहेत आणि हे सर्व रुग्ण खासगी लॅबमधून आले आहेत. हे लोक दिल्लीचे रहिवासी आहेत की बाहेरून आले आहेत याची पुष्टी केली जात आहे” अशी माहिती दिल्लीचे आरोग्यमंत्री पंकज सिंह यांनी दिली आहे.
गुजरातमधून आतापर्यंत एकूण ४० रुग्ण नोंदवले गेले आहेत आणि त्यापैकी ३३ एक्टिव्ह आहेत. हरियाणामधून ५ रुग्ण समोर आले आहेत, ज्यामध्ये दोन महिला आहेत. याशिवाय, उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्येही ४ रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी ३ रुग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे आणि एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
कोरोनाचे आकडे सतत बदलत आहेत, शुक्रवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने २५७ एक्टिव्ह रुग्णांची माहिती दिली होती. राजस्थानमध्ये दोन, सिक्कीममध्ये एक, महाराष्ट्रात ५६, केरळमध्ये ९५, पश्चिम बंगालमध्ये एक, कर्नाटकमध्ये १६, पुद्दुचेरीमध्ये १० आणि तामिळनाडूमध्ये ६६ रुग्ण आढळले आहेत.
आंध्र प्रदेश आरोग्य विभागाने नागरिकांना प्रार्थना सभा, पार्टी, लग्नसमारंभ किंवा सामाजिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने एकत्र येणं टाळण्यास सांगितलं आहे. बस स्टॉप, रेल्वे स्थानके आणि विमानतळ यासारख्या सार्वजनिक ठिकाणी लोकांना कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्यास सांगितलं. ज्या प्रवाशांनी कोरोनाचे रुग्ण जास्त आहेत अशा देशांना भेट दिली आहे त्यांनाही चाचणी करण्यास सांगण्यात येत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा नवीन व्हेरिएंट जेएन-१ शी संबंधित काही प्रकरणं आढळल्यानंतर झारखंडचा आरोग्य विभागही सतर्क झाला आहे.
