सोलापूर : सोलापूर जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया राबविण्याचा मार्ग न्यायालयातून मोकळा झाल्यानंतर जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी माजी आमदार दिलीप माने यांचे नाव एकमताने जवळपास निश्चित करण्यात आले आहे.
दूध संघाचे अध्यक्ष व आमदार प्रशांत परिचारक यांनी संघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या या जागेसाठी ही निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पाच महिन्यापूर्वीच आमदार परिचारक यांनी राजीनामा दिला होता. जूनमध्ये झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा राजीनामा नामंजूर करुन तहकूब करण्यात आला होता.
सोलापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात झाली असून, या बैठकीत माजी आमदार दिलीप माने यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या बैठकीला माजी आमदार गणपतराव देशमुख, माजी मंत्री दिलीपराव सोपल, माजी आमदार राजन पाटील, आमदार संजय शिंदे, माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यासह जिल्हा दूध संघाचे संचालक उपस्थित होते. आपल्याला कामाचा व्याप असल्याने आपण अध्यक्षपदासाठी इच्छुक नसल्याचे आमदार संजय शिंदे यांनी या बैठकीत सांगितल्याचे समजते.
माजी आमदार दिलीप माने यांचे नाव एकमताने निश्चित झाले असून आज बुधवारी अध्यक्ष निवडीसाठी प्रक्रिया सुरू होणार आहे. जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रकिया संघाच्या अध्यक्षपदासाठी आज बुधवारी निवडणूक होत आहे. यापार्श्वभूमीवर काल दूध संघाचे श्रेष्ठी नेते आणि संचालकांची पंढरपूरच्या शासकीय विश्रामगृहावर खलबते झाली. विशेष म्हणजे चक्क पायरीवर बसून या सर्व नेत्यांची चर्चा रंगली होती. दरम्यान, निवडणुकीविरोधात काही संचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
पंढरपूरच्या शासकीय विश्रामगृहावर काल झालेल्या बैठकीला माजी आमदार गणपतराव देशमुख, आमदार बबनराव शिंदे, माजी आमदार दिलीप सोपल, आमदार संजय शिंदे, दीपक साळुंखे, दिलीप माने, बबनराव आवताडे आदी उपस्थित होते. राजन पाटील म्हणाले, या बैठकीसाठी आमदार प्रशांत परिचारक यांनाही निरोप देण्यात आला होता. पण त्यांच्याकडून प्रतिसाद आला नाही.