दिसपूर, 03 जून (हिं.स.) : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार मोडीत काढल्यामुळे चिडलेल्या पाकिस्तानने म्हंटले होते की, चीन देखील ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी रोखू शकतो. ज्यामुळे ईशान्य भारतात दुष्काळ निर्माण होईल. पाकिस्तानच्या या धमकीला आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी तथ्यांच्या आधारे प्रत्युत्तर देत चीनची कितीही इच्छा असली तर ब्रह्मपुत्रेचे पाणी रोखू शकत नसल्याचे म्हंटले आहे.
पाकिस्तानला असा विश्वास वाटतो की भारत चीनकडून येणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. तथापि, हिमंता बिस्वा सरमा यांनी पाकिस्तानचे हे दावे पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. यासंदर्भात ट्विटरवर (एक्स) जारी केलेल्या संदेशात हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, ब्रह्मपुत्रा नदी तिच्या पाण्यापैकी फक्त 30 ते 35 टक्के पाणी चीनमधून आणते. ब्रह्मपुत्रा नदीला हे पाणी हिमालयातील हिमनद्या वितळण्यापासून आणि पावसापासून मिळते.
उर्वरित 65 ते 70 टक्के नदीचे पाणी भारतात वाहणाऱ्या नद्यांमधून आणि पावसातून येते. ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्याचा मुख्य स्रोत अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाम आणि नागालँडमध्ये होणारा मुसळधार पाऊस आहे. याशिवाय, सुबानसिरी, लोहित, कामेंग, मानस, धनसिरी, जिया भराली, कोपिली, दिगारू आणि कुल्सी सारख्या अनेक उपनद्या ब्रह्मपुत्रेत येऊन मिळतात, ज्यामुळे नदीचा पाण्याचा प्रवाह वाढतो. जेव्हा ब्रह्मपुत्र नदी चीन आणि भारताच्या सीमेवर भारतात प्रवेश करते तेव्हा तिचा पाण्याचा प्रवाह प्रति सेकंद 2 ते 3 हजार घनमीटर असतो. तथापि, पावसाळ्यात, आसामच्या मैदानी भागात नदीच्या पाण्याचा प्रवाह प्रति सेकंद 15 ते 20 घनमीटरपर्यंत वाढतो असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.