कोलकाता, 5 जून (हिं.स.)। भारत आणि बांगलादेशमधील यांच्यातील संबंध मोठ्या प्रमाणावर बिघडले आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे सीमा बीएसएफच्या एका जवानाचं अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.बांगलादेशाच्या काही नागरिकांनी बीएसएफच्या एका जवानाचं अपहरण करून त्याला बांगलादेशच्या सीमेमध्ये नेले. यामुळे काही तास भारत -बांग्लादेश सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर बॉर्डर गार्ड बांगलादेशच्या (बीजीबी) जवानांसोबत झालेल्या चर्चेनंतर या जवानाची सुटका करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी(दि.४) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास बांगलादेशच्या सीमेवरून काही ग्रामस्थांनी बीएसएफच्या एका जवानाला बळजबरीने बांगलादेशच्या सीमेमध्ये नेल्याची आणि तिथे बांधून ठेवल्याची माहिती बीएसएफला मिळाली. या घटनेची माहिती मिळताच बीएसएफचे वरिष्ठ अधिकारी माल्दा सीमेच्या दिशेने रवाना झाले. बांगलादेशमधील काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी या जवाना ओढत बांगलादेशमध्ये नेले होते, अशी माहिती बीएसएफमधील सूत्रांनी दिली.
ही घटना सुइटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चांदनी चौक बॉर्डर आऊटपोस्टजवळ घडली. येथे बीएसएफच्या ७१ व्या बटालियनचे जवान श्री गणेश सीमेवर संशयास्पद हालचालींवर पाळत ठेवून तपासणी करत होते. याचदरम्यान काही बांगालादेशी घुसखोर सीमा ओलंडण्याचा प्रयत्न करत होते, या जवानाने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान काही घुसखोरांनी या जवानाला पकडलं आणि सीमेच्या पलिकडे घेऊन गेले. सुरुवातीला श्री गणेश हे घुसखोरांचा पाठलाग करत चुकून बांगलादेशच्या सीमेमध्ये गेले होते, असे सांगण्यात आले. मात्र ते भारताच्या हद्दीतच होते. तसेच त्यांना जबरदस्तीने बांगलादेशमध्ये खेचून नेण्यात आले, अशी माहिती नंतर समोर आली.
या घटनेबाबत अधिक माहिती देताना बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, आमच्या एका जवानाला बांगलादेशी नागरिकांनी पकडलं होतं, ते त्याला घेऊन बांगलादेशात गेले, त्यानंतर आम्ही तातडीनं बीजीबीला या घटनेची माहिती दिली, त्यानंतर या जवानाची काही तासांमध्येच सुटका झाली.आता हा जवान आमच्यासोबत असून, त्याला कुठलीही इजा झालेली नाही.
दरम्यान या संदर्भातील एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे, मात्र या व्हिडीओला कोणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाहीये, या व्हिडीओमध्ये बांगादेश सीमेच्या आत असलेल्या सुदूर परिसरात एक जवानाला केळीच्या झाडाला बांधलेलं दिसून येत आहे. या जवानाला काही तास बांधून ठेवण्यात आल्याचा दावा देखील या व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे भारत-बांग्लादेश सीमेवर चांगलाच तणाव निर्माण झाला असून, बीएसएफकडून या व्हिडीओबाबतची सत्यता तपासली जात आहे