मुंबई, 5 जून (हिं.स.)।आयपीएलमध्ये चॅम्पियन ठरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या विजयी आनंदोत्सवात बुधवारी(दि.४) शोककळा पसरवणारी घटना घडली. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत ११ लोकांनी आपला जीव गमावला असून ३० हून अधिक लोक जखमी झाले. या घटनेवर वेगवेगळ्या क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर आता मास्टर ब्लास्ट सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंग यांच्यासह क्रिकेटमधील अनेक दिग्गजांनी या बंगळुरमधील दुर्देवी दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
सचिन तेंडुलकरनं एक्स अकाउंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहिलंय की, बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये घडलेली घटना खूपच दु:खद आहे. या घटनेतील पीडित कुटुंबाप्रति मनापासून संवेदना आहेत. कुटुंबियांना यातून सावरण्याचं बळ मिळो. अशी मी प्रार्थना करतो. अशा आशयाच्या शब्दांत सचिन तेंडुलकरने या दुर्देवी घटनेत जीव गमावलेल्यांना श्रद्धांजलीही वाहिली.
भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटर युवराज सिंग यानेही बंगळुरुच्या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने एक्स अकाउंटवरील पोस्टमध्ये लिहिलंय की, उत्सवाचा क्षण हा अकल्पनिय दुर्घटनेत रूपांतरित झाला. बंगळुरुच्या घटनेतील सर्व पीडित कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. पीडित कुटुंबियांना दु:खातून सावरण्याचे बळ मिळो. आरसीबीचा स्टार विराट कोहलीसह अनिल कुंबळे आणि अन्य दिग्गज क्रिकेटर्संनी या घटनेनंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून दु:ख व्यक्त केले आहे.
आयपीएलच्या १८ व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने १७ वर्षांचा दुष्काळ संपवत पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकली.विजयानंतर चॅम्पियन्स संघ बंगळुरुला पोहचल्यावर आरसीबीच्या चाहत्यांनी जल्लोषात संघाचे स्वागत केले. खुल्या बसमधील परेड रद्द केल्यावरही चाहत्यांनी खेळाडूंच्या बस मार्गावर दुतर्फा गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या खेळाडूंच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाआधी चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. ३५ हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या स्टेडियमबाहेर चाहत्यांनी लाखोच्या संख्येने गर्दी केली होती.
—————