नॉर्वे, 7 जून (हिं.स.)
भारतीय बुद्धीबळपटू आणि विश्वविजेत्या
डी. गुकेशला नॉर्वे चेस २०२५ स्पर्धेमध्ये तिसऱ्या स्थानावर समाधान मानाव लागलं,
तर नॉर्वेच्या अव्वल मानांकित आणि पाच वेळच्या जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनने या
स्पर्धेच्या अजिंक्यपदावर आपलं नाव कोरलं. अमेरिकेचा फॅबियानोने गुकेशला पराभूत
करत कार्लसननंतर दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली,
या स्पर्धेच्या नवव्या फेरी अखेर
कार्लसन १५ गुणांसह आघाडीवर होता. तर १४.५ गुणांसह गुकेश दुसऱ्या क्रमांकावर होता.
मॅग्नस कार्लसनने अखेरच्या म्हणजेच दहाव्या फेरीत भारताच्या अर्जुन विरुद्धचा
सामना बरोबरीत सोडवला आणि आपल्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केलं. तर डी. गुकेशला
अमेरिकन ग्रँडमास्टर फॅबियानो कारुआनाकडून पराभव सहन करावा लागला. या पराभवामुळे
गुकेशचं नॉर्वे चेस २०२५ स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न साकार होऊ शकलं नाही. तर
कार्लसनने तब्बल सातव्यांदा या स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं. दरम्यान, कारुआनाच्या
कुठल्याही चालींचं उत्तर गुकेशला मिळालं नाही. आणि सामना संपायला दोन सेंकद शिल्लक
असताना त्यानं फॅबियानोशी हस्तांदोलन केलं.
नॉर्वे चेस २०२५ मध्ये भारतीय
बुद्धीबळपटूंसाठी कायम स्मरणात राहणारा क्षण म्हणजे ज्यावेळी गुकेशने कार्लसनवर
मात केली. स्पर्धेच्या सहाव्या फेरीत गुकेशने अव्वल मानांकित कार्लसनला पराभूत करत
साऱ्यांचच लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं होतं. तर दुसरीकडे या धक्कादायक पराभवातून
सावरत कार्लसनने अखेर आपली आघाडी कायम ठेवत या स्पर्धेचं जेतेपद पटकावण्यात यश
मिळवलं. तर गुकेश ही स्पर्धा जिंकण्यात अपयशी ठरल्याने त्याचे चाहत्यांमध्ये
निराशा पसरली आहे.