नवी दिल्ली, 07 जून (हिं.स.) : देशात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून शुक्रवारी सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 5364 झाली. देशात 764 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले असून 4 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये. यात केरळमधील 2 आणि पंजाब, कर्नाटकातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
केरळमध्ये रुग्णांची संख्या वाढत असून येथे एका दिवसात 192 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर गुजरातमध्ये 107, पश्चिम बंगालमध्ये 58, दिल्लीत 30 आणि महाराष्ट्रात 22 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. दिल्लीत सक्रिय रुग्णसंख्या 592 वर पोहोचली आहे. गेल्या 1 जानेवारीपासून दिल्लीत कोरोनामुळे 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर गुरुवारपासून येथे एकही रुग्ण दगावलेला नाही. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे, केंद्राकडून रुग्णालयांच्या तयारीसाठी मॉक ड्रिल घेतले जात आहे.
कोरोना वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्राने सर्व राज्यांना ऑक्सिजन, आयसोलेशन बेड्स, व्हेंटिलेटर आणि आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.सध्याची कोरोनाची तीव्रता कमी आहे. पण विषाणूने स्थानिक आजाराचे रूप घेतल्यास आणि तो बदलत राहिल्यास रुग्णसंख्येत अधूनमधून वाढ होण्याची शक्यता आहे, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. सध्याच्या कोरोनामुळे घसा खवखवणे, थकवा, सौम्य स्वरुपाचा खोकला, ताप, स्नायूदुखी, नाक चोंदणे, कमी स्वरुपाचा हायपरथर्मिया, डोकेदुखी, मळमळ आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या आदी लक्षणे दिसून येत आहेत.