मुंबई, 13 जून (हिं.स.)। अहमदाबादवरून लंडनसाठी रवाना झालेले एअर इंडियाचे विमान गुरुवारी (दि.१२) कोसळल्याची दुर्घटना घडली होती. दरम्यान आता इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने आज (दि.१३) सकाळी मुंबईहून लंडनला जाणाऱ्या विमानाला अर्ध्यातूनच माघारी बोलावून घेतले, तर काही विमाने अन्यत्र वळवली. यावर उलटसुलट चर्चांना उधाण आले. त्यानंतर आता याबाबत एअर इंडियाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
मुंबईहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला अर्ध्यातूनच माघारी बोलावून घेण्यात आले. याविषयी एअर इंडियाने एक्सवर पोस्ट करून माहिती दिली आहे. एअर इंडियाने एक्स हँडलवरून दिलेल्या माहितीनुसार, “इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काही विमाने वळवण्यात आली. तर, काही विमानांना पुन्हा परतण्याचे आदेश देण्यात आले. याबाबत एअर इंडियाने यादी जाहीर केली. या यादीत मुंबई लंडन फ्लाइट एआय १२९ विमानाचाही समावेश आहे. हे विमान मुंबई विमानतळावर सुरक्षितपणे उतरले आहे.”
एअर इंडियाने या विमानांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये एआय १३० – लंडन हीथ्रो-मुंबई – व्हिएन्नाकडे वळवले आहे.एआय ०२- न्यू यॉर्क-दिल्ली – शारजाहकडे वळवले आहे. एआय ११६- न्यूयॉर्क-मुंबई – जेद्दाहकडे वळवले आहे. एआय २०१८- लंडन हीथ्रो-दिल्ली – मुंबईकडे वळवण्यात आले आहे. एआय १२९- मुंबई-लंडन हीथ्रो – मुंबईकडे परतली आहे.एआय ११९- मुंबई-न्यू यॉर्क – मुंबईकडे परतली आहे.एआय १०३- दिल्ली-वॉशिंग्टन – दिल्लीकडे परतली आहेत.
एआय १०६- नेवार्क-दिल्ली – दिल्लीकडे परतली आहे. एआय १८८- व्हँकूवर-दिल्ली – जेद्दाहकडे वळवले आहे. एआय १०१- दिल्ली-न्यू यॉर्क – फ्रँकफर्ट/मिलानकडे परतली आहे. एआय १२६- शिकागो-दिल्ली – जेद्दाहकडे परतली आहे. एआय १३२- लंडन हीथ्रो-बेंगळुरू – शारजाहला वळवले आहे. एआय २०१६- लंडन हीथ्रो-दिल्ली – व्हिएन्नाकडे वळवले आहे. एआय १०४- वॉशिंग्टन-दिल्ली – व्हिएन्नाकडे वळवले आहे.एआय १९०- टोरंटो-दिल्ली – फ्रँकफर्टला वळवले आहे. तर एआय १८९- दिल्ली-टोरंटो – दिल्लीकडे परतली आहे.
