संजय राऊतांनी व्यक्त केली सायबर हल्ल्याची शंकामुंबई, 14 जून (हिं.स.) : गुजरातच्या अहमादाबद येथे गुरुवारी एअर इंडियाच्या विमानाला अपघात होऊन 241 प्रवाशांसह सुमारे 270 लोक मृत्यूमुखी पडले. ही घटना म्हणजे घातपात तर नव्हे ? अशी शंका शिवसेनेचे (उबाठा-गट) खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.
हा प्रकार सायबर हल्ला असल्याचा संशय त्यांनी बोलून दाखवला.
अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडनकडे उड्डाण केल्यावर अवघ्या 12 ते 15 सेकंदात हा भीषण अपघात झाला. विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचं निधन झालं आहे. अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघाताचा डीजीसीए, एनएसजी, एनआयए, गुजरात एटीएसकडून कारणांचा तपास सुरु करण्यात आला आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शंका उपस्थित केली. यासंदर्भात राऊत म्हणाले की,
लोकांच्या मनात शंका आहे, त्याची चौकशी देश-विदेशातील एजन्सी करीत आहेत. यूपीएच्या काळात याची खरेदी केली गेली. त्यावेळी प्रफुल्ल पटेल यांना खुलासा करावा लागत होता. हा अपघात घडला कसा ? हा सिव्हिल एव्हिएशनला क्षेत्राला पडलेले कोडे आहे. अवघ्या 30 सेकंदामध्ये हे घडले कसे? एकाच वेळेला दोन इंजिन बंद कसे पडले ? कोणी सायबरच्या माध्यमातून हायजॅक केले का ? असे अनेक प्रश्न समोर येत आहेत. आपण त्यातले एक्सपर्ट नाही. पण शत्रू राष्ट्राकडून आपल्या देशावर जे सायबर हल्ले होत आहेत. ती अत्यंत गंभीर गोष्ट आहे. आपली यंत्रणा ठप्प केली जाते. या सगळ्याचा तपास एजन्सी करत असेल तर त्यावर फार चर्चा करणे योग्य नाही. दुर्दैवाने 300 पेक्षा जास्त लोकांना प्राण गमवावे लागले आहेत.
एक्स्पर्ट वेगवेगळे अँगल्स देत आहेत, त्याचा तपास होईल, असे राऊत म्हणाले. यासंदर्भात मनातील शंका उघडपणे बोलून गोंधळ निर्माण करणे बरोबर नाही. विविध क्षेत्रातून माहिती आमच्याकडे सुद्धा येत असते. मुळात मेंटेनन्स हा विषय आहे. एटीसीमध्ये क्षमतेपेक्षा 56 टक्के माणसे कमी आहेत. ज्यांच्याकडून विमानाच्या सुरक्षेची सगळ्यात जास्त जबाबदारीची आपण अपेक्षा करतो. तिथेच माणसे कमी आहेत. ते का आणि कशासाठी? अहमदाबाद एअरपोर्ट कोणाच्या ताब्यात आहे? अहमदाबाद एअरपोर्टवर विमानांच्या मेंटेनेसची जबाबदारी कोणावर आहे ? या सगळ्या गोष्टींवर प्रवाशांच्या मनात संशय आहे. हा संशय असाच राहिला तर विमानातून प्रवास करणाऱ्यांची संख्या घटेल, असेही संजय राऊत यांनी सांगितले.
