अमरावती, 14 जून (हिं.स.) जिल्ह्यात खरीप हंगामाची लगबग वाढली आहे. बी-बियाणे आणि खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. काही बँका नियमित कर्ज उचलून परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पीककर्ज देतात. बऱ्याच वेळा कर्ज वेळेवर मिळत नाही. थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना तर बँका दारातही उभे करीत नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना शेती कसण्यासाठी जवळची सोने-चांदी गहाण ठेवून वेळप्रसंगी विकून शेती करावी लागत आहे.
अमरावती जिल्ह्यात पाच वर्षापासून शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. निसर्गाचा लहरीपणा आणि शेतमालाला भाव नसल्यामुळे बऱ्याच वेळा तर शेतीत लावलेला पैसाही निघत नाही. शासनाने जाहीर केलेला हभीभावही शेतकऱ्यांच्या पदरी पडत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. यातूनच आत्महत्यासारखा टोकाचा निर्णय घेताना शेतकरी दिसून येतो. एकीकडे बी-बियाणे, खत व मजुरीचे दर दरवर्षी वाढत आहेत. यंदा बियाण्यांचे दर १०० ते २०० रुपयांनी वाढले आहे तर खताच्या दरात ५० ते ३०० रुपयांची वाढ झालेली आहे. या वाढत्या दरांमुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट ओढावले आहे.
थकीत शेतकऱ्यास बँक पीक कर्ज देण्यास टाळाटाळ होते. विविध कागदपत्रांची मागणी केली जाते. त्यामुळे थकीत कर्जदारांना अडचणी येतात. सोने-चांदी गहाण ठेवण्यासाठी अनेकदा सराफांकडे शेतकरी धाव घेतात.
(सराफा व्यावसायिक)
निवडणुकांत शेतकऱ्यांच्या नावाने मत मागितले जाते. परंतु, निवडणुकांत जिंकताच धनदांडग्यांचे कर्ज माफ केले जाते. गरीब शेतकऱ्यांचे कर्ज थकीत राहते. त्यामुळे कर्जबाजार अवस्थेत शेतकऱ्यांना जीवन जगावे लागते. शासनही शेतकऱ्यांच्या पाठीशी नसल्याची भावना शेतकऱ्यांत आहे. थकीत शेतकऱ्यांना कर्ज देण्याची व्यवस्था शासनाने करावी.
प्रदिप बंड शेतकरी, जसपूर
गत पाच वर्षांपासून शेतमालाला खुल्या बाजारात हमीभाव मिळत नाही. दिवाळीत आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती नाजूक आहे. अनेकदा खर्चही शेतीतून निघत नाही. परंतु, वडिलोपार्जित शेती म्हणून सोने गहाण ठेवण्याची वेळ येते.
मंगेश देशमुख शेतकरी (वणी बेलखेड)
मोडीचा भाव काय ?
शुद्ध सोन्याला (मोड काढून) ८० टक्क्यांपर्यंत रक्कम दिली जाते. गहाण ठेवलेल्या वस्तूवर ६० ते ७० टक्के इतकी रक्कम कर्ज स्वरूपात दिली जाते. थकीत शेतकरी वस्तू गहाण ठेवूनच आपली अडचण भागवितात.
