सोलापूर, 14 जून, (हिं.स.)। ग्रीष्मऋतूतील वाढत्या उन्हापासून श्री विठुरायाला शीतलता मिळावी, यासाठी दरवर्षी चैत्र पाडव्यापासून मृग नक्षत्राने पावसाळ्याची सुरुवात होईपर्यंत दररोज दुपारी चंदनउटी पूजेची परंपरा आहे. त्यानुसार यंदाच्या या पूजेला गुढीपाडव्यापासून सुरुवात करण्यात आली होती. पुजेची सांगता मंदिर समितीचे सदस्य व अधिकार्यांच्या हस्ते करण्यात आली. चंदनउटी पुजेतून मंदिर समितीला 35 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
श्री विठ्ठलाला उन्हाचा त्रास होऊ नये, त्याची तीव्रता कमी व्हावी, थंडावा मिळावा. या भावनेतून चंदनउटी पूजा केली जाते. विठुरायाप्रमाणे रुक्मिणीमातेलाही या पद्धतीने चंदन उटी लावण्यात येते. या चंदनउटी पुजेची सांगता पूजा झाली. श्री विठ्ठल व श्री रूक्मिणीमातेची चंदनउटी पुजा सदस्या अॅड. माधवीताई निगडे व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके तसेच सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख व व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते झाली. यावेळी सदस्या शकुंतला नडगिरे, विभाग प्रमुख पांडुरंग बुरांडे, सहायक विभाग प्रमुख संदीप कुलकर्णी, पांडुरंग दशपुत्रे आदी उपस्थित होते.