मुंबई, 16 जून (हिं.स.)।हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मुंबईत रविवार(दि.15) जून) रात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे. सोमवारी(दि.१६) पहाटेही पावसाचा जोर कायम होता.त्यामुळे पुढील काही तास मुंबईत जोरदार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचून रस्ते वाहतुकीची कोंडी होऊ शकते. तसेच लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो.
मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे परिसरात सध्या जोरदार पाऊस बरसत आहे. पहाटे पासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने मुंबईत धुमाकूळ घातला असून शहराचा मोठा भाग पाण्याखाली गेला आहे आणि अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. पहाटे 2 ते 5 वाजेच्या दरम्यान दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरांना सर्वाधिक फटका बसला, त्यामुळे हवामान खात्याने दिवसभरासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि वादळाचा सेल आठवड्याच्या मध्यापर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. भरतीच्या चक्रामुळे किनारी आणि सखल भागात पूर येण्याची शक्यता वाढू शकते.
पुढे आलेल्या माहितीनुसार, फोर्टमध्ये सर्वाधिक 74 मिमी पाऊस पडला, त्यानंतर वांद्रे (62 मिमी), मलबार हिल (60 मिमी) आणि लोअर परेल (58मिमी) यांचा क्रमांक लागतो. एक्सवरील एका अंदाजानुसार, हाजी अली (56 मिमी), माटुंगा (56 मिमी), ग्रँट रोड आणि सांताक्रूझ (प्रत्येकी 47 मिमी) आणि दादर (41 मिमी) या भागात लक्षणीय पाऊस पडला. तर दुसरीकडे कमी प्रभावित भाग असलेल्या अंधेरीत (33 मिमी), मुंबई सेंट्रल (30 मिमी) आणि बोरिवली (28 मिमी) या भागातही सातत्याने पाऊस पडला. वरळी (26 मिमी), बीकेसी (25 मिमी), वर्सोवा (23 मिमी) आणि दिंडोशी (22 मिमी) येथेही पावसाचा जोर बघायला मिळाला.
