तेहरान , 17 जून (हिं.स.)।इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष वाढतच चालला असून, दोन्ही देश एकमेकांवर सतत हल्ले करत आहेत. या वाढत्या संघर्षामुळे दोन्ही राष्ट्रांचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. अशातच सोमवारी(दि.१६) पुन्हा एकदा इस्रायलने इराणवर क्षेपणास्त्रांनी हल्ला चढवला आहे. या हल्ल्यात इस्रायलने सरकारी वृत्त प्रसारण केंद्राला लक्ष्य केले आहे. या हल्ल्यानंतर सरकारी दूरदर्शनचे थेट प्रक्षेपण अचानक थांबवण्यात आले. इतकंच काय तर अँकरलाही स्टुडिओ सोडून पळ काढावा लागला.
मीडिया रिपोर्टनुसार, इराणच्या अनेक भागांवर इस्रायली क्षेपणास्त्रांचा वर्षाव होत आहे. दोन्ही देश सातत्याने एकमेकांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला करत असल्याने तणाव शिगेला पोहोचला आहे.या घटनेचा एक व्हिडीओही समोर आला आहे, ज्यामध्ये एक अँकर लाईव्ह बुलेटिन दरम्यान बातम्या वाचत असताना दिसत आहे. याचवेळी स्टुडिओच्या परिसरात एक क्षेपणास्त्र येऊन आदळते. या घटनेमुळे अँकर बुलेटिनच्या मध्यातच घाबरते आणि तिला जागेवरून उठून पळून जावे लागते. सुदैवाने, या घटनेत अँकर सुरक्षितपणे बाहेर पडण्यात यशस्वी होते.
इस्रायलने यापूर्वीच सांगितले होते की, ते आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य मार्गावर आहेत. महत्त्वाचे म्हणजे, इस्रायलने आधीच तेहरानमधील लोकांना त्यांची घरे रिकामी करण्यास सांगितले होते. दोन्ही देशांमधील संघर्ष वाढत असल्यामुळे दोन्ही देशांचे नागरिक सुरक्षित निवाऱ्यासाठी पळ काढत आहेत, ज्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.