जेरुसलेम , 17 जून (हिं.स.)।इराण-इस्रायल संघर्ष गेल्या चार दिवसांपासून सुरु असून दोन्ही देशांमधील वाद गंभीर वळणांवर पोहोचला आहे. यामध्ये दोन्ही देशांचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.त्यानंतर सोमवारी(दि.१६) संध्याकाळी इस्रायलने पुन्हा एकदा इराणची राजधानी तेहरानमधील सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर बॉम्ब टाकले. यानंतर आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मोठं विधान केलं आहे. इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांना संपवल्यानंतरच हा संघर्ष संपेल असं विधान नेतन्याहू यांनी केले आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एका मुलाखतीत, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येमुळे दोन्ही देशांमधील सुरू असलेले युद्ध आणि तणाव संपेल असं म्हटलं आहे. इस्रायलची लष्करी कारवाई ही संघर्ष सुरु ठेवण्यासाठी नाही तर तो संपवण्यासाठी आहे, असंही नेतन्याहू म्हणाले. इस्रायल-इराण संघर्षाचा चौथ्या दिवस असताना पंतप्रधान नेतन्याहू यांनी हे वक्तव्य केले आले. दोन्ही देश एकमेकांवर क्षेपणास्त्रे डागत आहेत ज्यामुळे नागरिकांनाही लक्ष्य केले जात आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असून दोन्ही देशांनी त्यांच्या नागरिकांना मोठ्या संघर्षासाठी तयार राहण्यास सांगितले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या सर्वोच्च नेत्याला लक्ष्य करण्याची इस्रायलची योजना नाकारल्यानंतर नेतान्याहू यांनी खोमेनी यांना संपवण्याची भाषा केली आहे. यामुळे संघर्ष वाढणार नाही पण तो संपेल, असेही नेतान्याहू म्हणाले. मात्र ट्रम्प यांना यामुळे संघर्ष आणखी वाढू शकतो अशी भीती होती म्हणून त्यांनी खोमेनी यांना संपवण्याची योजना नाकारली.
दरम्यान, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी एका एक्स पोस्टमध्ये बेंजामिन नेतन्याहूंबाबत भाष्य केलं आहे. “जर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना खरोखरच मध्यस्थी करायची असेल आणि हे युद्ध थांबवण्यात रस असेल, तर त्यांची पुढील पावले महत्त्वाची असतील. इस्रायलने त्यांची लष्करी कारवाई ताबडतोब थांबवावी, नाहीतर आम्ही प्रत्युत्तर देतच राहू. फक्त एका फोन कॉलने नेतान्याहूवर दबाव आणता येतो,” असं अब्बास अराघची यांनी म्हटलं.
—————