डेहरादून, 18 जून (हिं.स.)।केदारनाथ यात्रेच्या मार्गावर मोठी दुर्घटना घडली आहे. गौरीकुंड-केदारनाथ पायी मार्गावर जंगलछट्टीजवळ दरड कोसळली. या नैसर्गिक आपत्तीमध्ये पाच प्रवासी खोल दरीत पडले, त्यापैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला तर ३ जण गंभीर जखमी झाले असून जखमींना प्राथमिक उपचारांसाठी सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गौरीकुंड-केदारनाथ पायी मार्गावर जंगलछट्टीजवळ दरड कोसळली. या नैसर्गिक आपत्त्मध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक प्रशासन आणि एसडीआरएफ पथकाकडून बचाव कार्य सुरू करण्यात आले.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दरड कोसळल्यामुळे अचानक रस्ता बंद झाला आणि प्रवाशांना अडचणीत सापडावे लागले. मोठ्या प्रमाणावर डोंगराचा ढिगारा खाली आल्याने ही दुर्घटना घडली.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडच्या बहुतेक भागात मान्सूनपूर्व पावसाचे सत्र सुरू असून त्यामुळे पर्वतीय भागात दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. आजही हवामान विभागाने बागेश्वर आणि पिथोरागड जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय इतर भागांमध्येही वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २३ जूनपर्यंत संपूर्ण उत्तराखंड राज्यात अशाच स्वरूपाचे हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे यात्रेकरूंना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या केदारनाथ येथे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी यात्रेत सहभागी झालेल्यांची संख्या नवा विक्रम करणार आहे. यंदा यात्रा कालावधीच्या केवळ ४७ दिवसांतच येणाऱ्या भाविकांची संख्या ११ लाखांच्या पुढे गेली आहे.या वर्षी गेल्या दोन वर्षांच्या संपूर्ण हंगामातील विक्रम मोडण्याची अपेक्षा आहे. प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असल्याने, तीर्थयात्रा आणि पर्यटनाला चालना मिळत आहे आणि मंदिर समितीचे उत्पन्नही वाढत आहे, अशी माहिती बद्रीकेदार मंदिर समितीचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी वायएस पुष्पन यांनी दिली.