मुंबई : मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर राजकीय नेत्यांपासून सर्वसामान्य नागरिक अभिनेत्री कंगना रनौतविषयी चीड व्यक्त करत आहेत. प्रख्यात अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीही कंगनाविषयी संताप व्यक्त केला. “उचलली जीभ आणि लावली टाळ्याला” असं म्हणत त्यांनी कंगनाला मराठीतूनही सुनावलं.
“प्रिय कंगना, मुंबई हे असे शहर आहे, जिथे बॉलिवूड स्टार होण्याचे तुझे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्यामुळे या अद्भुत शहराबद्दल आदरभाव ठेवण्याची तुझ्याकडून अपेक्षा आहे. पाकव्याप्त काश्मीरसोबत तू मुंबईची केलेली तुलना धक्कादायक आहे! उचलली जीभ आणि लावली टाळ्याला” असे लिहित रेणुका यांनी संताप दाखवणारा इमोजीही पोस्ट केला आहे.
रेणुका शहाणेंच्या ट्वीटला कंगनाने तात्काळ उत्तरही दिले. “प्रिय रेणुकाजी, सरकारच्या कमकुवत कारभारावर केलेली टीका त्या शहरावरील टीका कधीपासून मानली जाऊ लागली? मला वाटत नाही की आपण इतक्या भोळ्याभाबड्या आहात. आपणसुद्धा रक्तासाठी तहानलेल्या गिधाडाप्रमाणे माझ्या मांसाचा तुकडा घेण्याची वाट पाहत होतात? आपल्याकडून चांगल्या अपेक्षा होत्या” असे कंगनाने लिहिले आहे.
कंगनाच्या उत्तराला रेणुका शहाणे यांनी पुन्हा प्रत्युत्तर दिल्याने ट्विटर वॉर रंगल्याचे चित्र आहे. “प्रिय कंगना, मी सरकारवर टीका करण्यास हरकत घेत नाही. पण “मुंबई पीओकेसारखी का वाटत आहे” ही मला मुंबई आणि पाकव्याप्त काश्मीर यांच्यात थेट तुलना असल्यासारखं वाटतं. ही तुलना खरोखर खूप वाईट होती. मुंबईकर म्हणून मला ते आवडलं नाही! कदाचित तुझ्याकडून आणखी चांगल्याची अपेक्षा करणे, हाच माझा भोळेपणा होता” असा टोला रेणुका शहाणे यांनी लगावला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* अनेक अभिनेत्यांची टीका
कंगना राणौत हिने नुकतंच “मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची” उपमा दिल्यामुळे आता सोशल मीडियावर कंगनावर टीकेचा भडिमार सुरु झाला आहे.
अभिनेता सुबोध भावेनं सुद्धा कंगनाला खडेबोल सुनावले आहे. ‘ताई आपल्याला जे राजकारण करायचं असेल ते आपल्या गावाला जाऊन जरूर करा. जिथे तुम्हाला काम मिळालं, ओळख मिळाली त्या शहराचा आणि राज्याचा मान ठेवा. आमचं प्रेम आहे आणि आम्हाला अभिमान आहे मुंबईचा!
अभिनेता स्वप्निल जोशीने यावर आय लव यू मुंबई म्हटलंय. सोनू सूद, रितेश देशमुख, उर्मिला मातोंडकर, स्वरा भास्कर यांनीही कंगनाच्या ट्विटचा विरोध करण्यासाठी मुंबईविषयीचे प्रेम व्यक्त केले आहे.
आधी मुंबई पोलीस आणि नंतर मुंबईविषयी वक्तव्य केल्याने सर्वसामान्य नागरिकांनी कंगनाचा समाचार घेतला होताच. पण शिवसेना खासदार संजय राऊत, भाजप नेते निलेश राणे, काँग्रेस मंत्री नितीन राऊत अशी सर्वपक्षीय टीकाही तिच्यावर झाली.
* काय आहे प्रकरण ?
“शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला उघड धमकी दिली आणि मुंबईत पुन्हा पाऊल ठेवू नकोस असा इशारा दिला. याआधी मुंबईच्या रस्त्यांवर ‘आझादी’च्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?” असा प्रश्न कंगनाने ट्विटरवरुन विचारला होता. यावर संजय राऊत यांनीही ट्विटरवर खेळण्यापेक्षा पोलिसांकडे पुरावे द्यावेत, असा टोला कंगनाला लगावला होता.
ट्विटरवर आपली बदनामी करणारे ट्वीट ‘लाईक’ करण्यावरुन कंगनाचे काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांशी वाजले होते. “सुशांतच्या मारेकऱ्यांविरुद्ध लढा देणाऱ्या लोकांची निंदा करणारे ट्वीट लाईक केले जात आहेत. छेडछाड आणि दमदाटीचा निषेध करण्याऐवजी मुंबई पोलीस आयुक्त त्यांना प्रोत्साहन देत आहेत. लज्जास्पद!!” असे ट्वीट कंगनाने स्क्रीनशॉटसह केले होते.
“बॉलिवूड माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते. त्यामुळे हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी” असंही कंगना म्हणाली होती.