पुणे, 24 जून (हिं.स.) : पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतराची आता चर्चा सुरु झाली आहे. त्यातच स्टेशनला कोणाचं नाव द्यायचं..? त्यावरुन आता वाद निर्माण झाला आहे. यासाठी 4 विविध नावं यासाठी पुढे आली असून विविध राजकीय गटांकडून ही नावं पुढं आणण्यात आली आहेत. यामध्ये पुण्यातील राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी यासाठी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव सुचवलं आहे. तर स्टेशनला महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव देण्याची मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे.
मेधा कुलकर्णी यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना म्हटलं की, “पुणे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्यात यावं, अशा प्रकारची मागणी पुण्यातल्या अनेक संघटनांनी वेळोवेळी केलेली आहे. मी सुद्धा याचा पुनरुच्चार आजच्या मिटिंगमध्ये केला. पुण्यातील सांस्कृतीक इतिहासाच्या ज्या काही पाऊलखुणा आहेत, त्या पुणे रेल्वे स्टेशनवर दिसल्या पाहिजेत. अशी मागणी मी केलेली आहे. पुणे स्टेशनचं नुतनीकरण होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर मी ही मागणी केली आहे.