पुणे, 26 जून (हिं.स.) : नियोजनाचा अभाव व एकूणच मतमोजणीचा अंदाज न आल्याने माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी आजवरच्या इतिहासातील सर्वात प्रदीर्घ काळ चाललेली मतमोजणी ठरली. मंगळवारी (ता. 24) सकाळी 8 वाजेपासून सुरु झालेली ही प्रक्रीया बुधवारी (ता. 25) रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहिली.तब्बल 36 तासाहून अधिक काळ जागे राहण्याचा विक्रमही काही कार्यकर्ते, अधिकारी व कर्मचा-यांनीही या निमित्ताने नोंदविल्याची चर्चा मतमोजणी केंद्रामध्ये होती. मतमोजणी करताना टेबलची संख्या वाढविण्यासह कर्मचारी संख्या वाढविण्याची गरज असताना ते का करण्यात आले नाही असा प्रश्न उमेदवार, कार्यकर्त्यांनी केला.
ज्या जागेची निवड प्रशासनाने मतमोजणीसाठी केलेली होती, ती पार्किंगची जागा होती, त्यात पुरेशी जागा नसल्याने गर्दी झालेली होती. हवा खेळती नसल्याने कमालीचा उकाडा होता.पहिली फेरी संपण्यास रात्रीच्या 12 वाजेनंतर अनेकांना कमालीचा थकवा जाणवत असतानाही त्यांनी तशाच अवस्थेत काम सुरु ठेवलेले होते. यात कर्मचारी व अधिका-यांसोबतच कार्यकर्तेही होते. दगाफटका होऊ नये या भीतीने शब्दशः डोळे ताणून कार्यकर्त्यांनी काम केले.
ज्या इमारतीत मतमोजणी सुरु होती, त्याच्या वरील बाजूस माध्यमांसाठी कक्ष करण्यात आला होता, त्या ठिकाणी गादया टाकून प्रतिनिधी व कार्यकर्ते झोपल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेकांना झोप आवरत नव्हती तरीही त्याही स्थितीत जवळपास 36 तास अनेकांनी खिंड लढविली. अनेकांचे डोके दुखत होते, तर काहींचे डोळे जळजळत होते, तरीही शेवटपर्यंत अनेकांनी जागा सोडली नाही.नियोजनाच्या अभावाचा कमालीचा मनस्ताप अनेकांना सहन करावा लागला. जवळपास 36 तासांच्या प्रदीर्घ काळानंतर अखेर मतमोजणी प्रक्रीया पूर्णत्वास गेली.