तब्बल १३.८ लाखांची रोकड घेऊन लुटारू पसार अमरावती, 26 जून (हिं.स.) : फायनान्स कंपनीची रक्कम बँकेत भरायला जाणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना शहरातील सेंट्रल बँक शाखेनजिक बुधवारी (ता. २५.) भरदुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली. चोरट्यांनी १३ लाख ८ हजार ७२० रुपये लुटून नेले. लागोपाठ घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील कॉलनी परिसरात क्रेडिट ऍसेस मायक्रो ग्रामीण प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची शाखा असून यामध्ये ग्रामीण भागातील गटाकडून पैसे वसूल करतात व ती रक्कम मोर्शीच्या भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत जमा करतात.
नेहमीप्रमाणे बँकेतील कर्मचारी शुभम गुणवंत म्हस्के (वय २५) व सुंदर शालिकराम धिकार (वय २८) हे (एमएच २७ डीडी ५०४१) क्रमांकाच्या दुचाकीने अंदाजे दुपारी तीन वाजताच्या दरम्यान कंपनीची १३ लाख ८ हजार ७२० रुपये जमा रक्कम मोर्शीच्या भारतीय स्टेट बँकमध्ये जमा करण्यासाठी जात होते. दरम्यान मुख्य रस्त्यावर असलेल्या सेन्ट्रल बँकेसमोर मागून आलेल्या पल्सर गाडीवरील एकाने त्यांच्या दुचाकीला धक्का देऊन पाडले व ते पडल्यानंतर त्यांना चाकू दाखवून त्यांच्या गाडीची चाबी व पैशाची बॅग घेऊन पलायन केले.
यामध्ये दि.२४ व २५ जूनची जमा केलेली रक्कम असल्याचे समजते. या अगोदर शहरात १८ जून रोजी क्राईम ब्रँच पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून दोन अज्ञात चोरट्यांनी श्यामसुंदर राधाकिसन बंग यांची सोन्याची अंगठी व गोफ असा दोन लाखांचा ऐवज हात सफाईने लंपास केल्याची घटना घडली होती. या घटनेप्रकरणी मोर्शी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास आरंभीला आहे.—————