नवी दिल्ली,१ जुलै, (हिं.स.) : भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी आज एक
महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ‘रेलवन’ या नावाचे एक बहुप्रतिक्षित सुपर अॅप अधिकृतपणे
लॉन्च केले आहे. सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम्स (सीआरआयएस) यांनी हे अॅप तयार केले असून, यामुळे प्रवाशांच्या सर्व गरजा एकाच अॅपमधून
पूर्ण करता येणार आहेत. यामुळे रेल्वे प्रवास अधिक सुलभ, जलद आणि सुसंगत होईल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
‘रेलवन’ हे सुपर अॅप
भारतीय रेल्वेच्या विविध अॅप्सचा एकत्रित पर्याय आहे. यापूर्वी आयआरसीटीसी, यूटीएस, एनटीईएस, रेल मदत यांसारखी अनेक अॅप्स
प्रवाशांना वेगवेगळ्या सेवांसाठी वापरावी लागत होती. पण आता या सर्व सेवा एकाच अॅपमध्ये
उपलब्ध झाल्यामुळे वेळ, डेटा आणि गोंधळ टळणार आहे.
रेलवन अॅपमध्ये
उपलब्ध सुविधा : आरक्षित तिकिट बुकिंग ,अनारक्षित तिकीट बुकिंग, प्लॅटफॉर्म तिकीट बुकिंग, मासिक सिझन तिकीट (MST) बुकिंग , पीएनआरस्टेटस तपासणी, लाईव्ह ट्रेन रनिंग स्टेटस
पाहण्याची सुविधा, ट्रेनमध्ये खाद्यपदार्थ ऑर्डर करण्याची
सोय, रेल्वे तक्रारी नोंदविणे, टीडीआरफाईल करण्याची सुविधा.
तसेच हे अॅप अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर आजपासून (१ जुलै २०२५)
मोफत डाउनलोडसाठी उपलब्ध आहे. अॅप वापरण्यास अगदी सोपे असून, स्मार्टफोनवरील कोणताही वापरकर्ता याचा सहज वापर
करू शकतो. अॅपमध्ये नोंदणीसाठी रेल्वे खात्याच्या मोबाइल क्रमांकाचा वापर केला
जाईल.
‘रेलवन’ अॅपमुळे देशभरातील
कोट्यवधी प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या
साहाय्याने रेल्वेने प्रवाशांसाठी एकत्रित सेवा उपलब्ध करून दिल्याने रेल्वे
प्रशासनाच्या दिशेने हे एक मोठे पाऊल ठरणार आहे.