सोलापूर, 1 जुलै (हिं.स.)। अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वैष्णवांना सुमारे 31 हजार भाकरी व 135 किलो बेसनाचे पिठले, ठेचा, लोणचे, कांदा अशा अस्सल ग्रामीण अन्नदान वाटपाचा प्रारंभ युवा नेते सयाजीराजे मोहिते -पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते -पाटील, ऋतुजादेवी मोहिते -पाटील, कृष्णप्रिया मोहिते -पाटील, सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे -पाटील प्रमुख उपस्थित होते. या उपक्रमात संस्थेच्या 10 शाखेतून 11 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.
श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे अकलूज येथे आगमन होत आहे. पालखीचा आदल्या दिवशीचा मुक्काम सराटी (जि.पूणे) येथे होता. सराटी व अकलूज हे अंतर केवळ 3 कि.मी. आहे. तसेच अकलूज येथे मुक्कामाच्या मोठ्या सुविधा असल्याने लाखो वैष्णव आदल्या दिवशीच मुक्कामाला अकलूजला येतात. आदल्या दिवशीही वैष्णवांनाही अन्नदान व्हावे. त्यांना घरगुती भोजनाचा आस्वाद मिळावा. या हेतूने जयसिंह मोहिते -पाटील यांनी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सन 2015 पासून अन्नदानाला सुरुवात केली आहे. तीच परंपरा संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते- पाटील, सदस्या स्वरूपाराणी मोहिते -पाटील, युवा नेते सयाजीराजे मोहिते -पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत सुरु आहे. अन्नदान वाटपाचे हे 11 वे वर्ष आहे.