जळगाव : मी मुख्यमंत्री पदाचा दावेदार असल्यामुळे मला नीटपणे संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र मी असा सहजासहजी संपणारा राजकारणी नाही. मी स्वस्थ बसणारा राजकारणी नाही. माझ्यावरचे सर्व आरोप खोटे आहेत. मी कोणता उपद्व्याप केलेला नाही. अनेकांवर घोटाळ्यांचे आरोप झालेत सर्वांना क्लीन चिट मिळते. मग मला का क्लीनचिट मिळत नाही. लवकरच अनेक रहस्यांचा उलगडा होईल”, असं भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले.
“बाकीच्यांवर कारवाई होत नाही. माझ्यावर का कारवाई करण्यात आली. माझ्यावरचे खोटे आरोप आतापर्यंत सिद्ध करू शकले नाही. बदनाम करण्यासाठी काही विशिष्ट लोकांनी मीडिया ट्रायल केली होती. जाणीवपूर्वक मला पदावरून बाजूला करण्याचा प्रयत्न केला. भ्रष्ट लोकांना पक्षामध्ये घेतले. मात्र ज्यांनी चाळीस वर्ष जिवाचं रान केले त्यांच्या जीवाची कदर नाही का?”, असंही खडसे म्हणाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मला बदनाम करण्याचं शल्यं माझ्या मनात आहे. त्यामुळेच भाजपा सरकार सत्तेत आले नाही. नेत्यांच्या प्रवृत्तीमुळे हे सरकार येऊ शकले नाही. ओबीसींवर अन्याय बहुजनांवर अन्याय मग त्या कालखंडात या धोरणामुळे बहुजनांची तिकीटं कापली. ज्यांना तिकीट दिली त्यांना हरवलं. माझं तिकीट कापलं, माझ्या मुलीला हरवण्यासाठी प्रयत्न केला. याबबतचे सर्व पुरावे मी दिले आहेत तरी देखील कारवाई होत नाही?”, असं खडसेंनी सांगितले.
“मी असा काय गुन्हा केला. जे लोक या विधानसभेत आडवे येत होते त्यांना आडवे करण्याचे काम यात करण्यात आले. मी कधीच पक्षावर टीका केली नाही. आम्ही कष्टाने आणलेलं भाजपचं सरकार गेल्याची खंत असल्याचे खडसे यांनी सांगितले.”