मुंबई, 9 जुलै (हिं.स.) – संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कर्मचाऱ्याला केलेली मारहाण समर्थनीय नाही. अन्नाच्या दर्जाबाबत तक्रारी आल्या असतील, तर त्यासाठी कायदेशीर कारवाई करता येऊ शकते. पण मारहाण करणे हे पर्याय असू शकत नाही. जे चुकीचं असेल त्यावर कायदेशीर कारवाई करता येऊ शकते. पण मारहाण करणं योग्य नाही. मी मुद्द्यावर संजय गायकवाडला समज देईन. मी त्यांना आताही सांगितलं आहे की, असं करणं योग्य नाही. आम्ही याचं समर्थन करत नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
जेवण खराब असल्याच्या मुद्द्यावरून आ. गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवासातील कँटिनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली. आमदार गायकवाड यांच्या या कारनाम्याचा मुद्दा विधान परिषदेत शिवसेनेचे (उबाठा) आमदार अनिल परब यांनी उपस्थित केला. त्यांनी संजय गायकवाड यांचे निलंबन करण्याचीच मागणी केली. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त केली. अध्यक्षांना या प्रकरणाची दखल घेऊन काय कारवाई करायची ती करावी, अशी भूमिका मांडली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही यावर भूमिका स्पष्ट केली.
