नवी दिल्ली 9 जुलै (हिं.स.)। गुजरातच्या वडोदरा जिल्ह्यात पूल कोसळल्याच्या दुर्घटनेत झालेल्या मृत्यूवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातात जखमी झालेल्यांच्या लवकर बरे होण्यासाठी त्यांनी प्रार्थना केली असून, प्रभावित कुटुंबांप्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच पंतप्रधानांनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (पीएमएनआरएफ) २ लाख रुपयांची अनुग्रह रक्कम जाहीर केली आहे. याशिवाय, अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना ५० हजार रुपये मदत दिली जाणार आहे.
पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) बुधवार (९ जुलै) रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर शोकसंदेश शेअर केला. या संदेशात म्हटले आहे, “वडोदरा जिल्ह्यात पूल कोसळून झालेली जीवितहानी अतिशय दुःखद आहे. ज्यांनी आपले आप्तस्वकीय गमावले आहेत, त्यांच्याप्रती माझ्या संवेदना. देवाकडे प्रार्थना आहे की जखमी व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात.”
गुजरातमधील एका जुन्या पुलाच्या कोसळण्याने तेथून जात असलेले दोन ट्रक, एक बोलेरोसह चार वाहने महिसागर नदीत कोसळली. या घटनेत आता पर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून, स्थानिक नागरिक आणि बचाव पथकांनी आठ जणांना सुखरूप वाचवले आहे. या पुलाच्या कोसळण्यामुळे आणंद ते वडोदरा, भरूच आणि अंकलेश्वर यांचा थेट संपर्क तुटला आहे.
—————
