वॉशिंगटन , 15 जुलै (हिं.स.)।रशियाने जर पुढील ५० दिवसांत युक्रेनमधील युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर त्याला मोठ्या प्रमाणावर टॅरिफचा सामना करावा लागेल.केवळ युद्ध थांबावे, एवढीच आपली इच्छा आहे. तसेच रशियानेही युद्ध थांबवून व्यापारावर लक्ष केंद्रित करावे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ते ओव्हल ऑफिसमध्ये नाटोचे सरचिटणीस मार्क रूट यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान बोलत होते.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, जर रशियाने आपले ऐकले नाही, तर त्याला जगभरात एकाकी पाडण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल. रशियाच्या आर्थिक भागीदारांवरही अतिरिक्त शुल्क लादले जाईल. एवढेच नाही तर, युरोप मजबूत राहणे महत्त्वाचे आहे. अशा स्थितीत, जर युरोपीय देशांनी अमेरिकेकडून लष्करी उपकरणे खरेदी केले आणि ते युक्रेनला हस्तांतरित केली तर आपल्याला कोणताही आक्षेप नाही,
असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.व्हाइट हाऊसने डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान अधिक स्पष्ट करत म्हटले आहे की, “त्यांनी (डोनाल्ड ट्रम्प) रशियाला 100 टक्के टॅरिफचा इशारा दिला आहे. तसेच, दुय्यम कराचा अर्थ असा की, रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवरही अतिरिक्त टॅरिफ लादला जाईल.” दरम्यान, रशियाकडून तेलाची आयात करणाऱ्या देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. यापूर्वी अनेकवेळा भारताच्या रशियाकडून तेल खरेदीवर अमेरिकेने आक्षेप घेलता आहे. मात्र, भारताने प्रत्येक वेळा देश हिताच्या मुद्द्यावर बोलत अमेरिकेच्या आक्षेपाकडे दुर्लक्ष केले आहे.