चंदीगड , 15 जुलै (हिं.स.)।जगातील सर्वात वयस्कर मॅरेथॉन धावपटूचा किताब पटकवणारे फौजा सिंग यांचे सोमवारी (दि.१४) सायंकाळी रस्ते अपघातात निधन झाले. ते ११४ वर्षाचे होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी(दि.१४) दुपारी जालंधर-पठाणकोट महामार्गावर एका कारने फौजा सिंग यांना धडक दिली. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर, त्यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, त्यांना वाचवण्यात अपयश आले. सायंकाळी ७.३० वाजता त्यांचे निधन झाले.पंजाबचे राज्यपाल गुलाब चंद कटारिया यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर पोस्टमध्ये लिहिले आहे की, “प्रसिद्ध मॅरेथॉन धावपटू आणि लवचिकता आणि आशेचे प्रतीक असलेले सरदार फौजा सिंग जी यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. वयाच्या ११४ व्या वर्षीही ते त्यांच्या उत्साहानेतरुणांना प्रेरणा देत राहिले. डिसेंबर २०२४ मध्ये त्यांच्या गावी बियास, जिल्हा जालंधर येथून निघालेल्या दोन दिवसांच्या ‘नशा मुक्त – रंगला पंजाब’ या पदयात्रेत त्यांच्यासोबत चालण्याचा मान मला मिळाला.
“आज त्यांच्या गावात झालेल्या एका रस्ते अपघातात त्यांचे निधन झाले हे ऐकून खूप दुःख झाले. निरोगी आणि ड्रग्जमुक्त पंजाबसाठी लढणाऱ्यांच्या हृदयात त्यांचा वारसा कायमचा जिवंत राहील. त्यांच्या कुटुंबियांना आणि जगभरातील चाहत्यांना माझ्या मनापासून संवेदना. त्यांच्या आत्म्याला चिरंतन शांती लाभो, असंही पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे.फौजा सिंग यांचा जन्म १९११ मध्ये पंजाबमधील बिसालपूर गावात झाला. त्यांचा जन्म ब्रिटिश भारतात झाला आणि नंतर ते इंग्लंडमध्ये स्थायिक झाले. फौजा सिंग यांच्यासाठी वय कधीही अडथळा ठरले नाही. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी धावणे गांभीर्याने घेतले. फौजा सिंग यांनी २००० मध्ये त्यांची पहिली शर्यत, लंडन मॅरेथॉन, धावली.