तेहरान, 22 जुलै – अमेरिकेचे आणि इस्रायलचे हल्ले इराणच्या अणुऊर्जा सुविधांवर झाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले तरी, “इराण आपला अणुकार्यक्रम थांबवणार नाही,” असा स्पष्ट संदेश इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अरघची यांनी सोमवारी दिला. युरोपियन देशांसोबत होणाऱ्या आगामी चर्चेच्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वपूर्ण वक्तव्य करण्यात आले आहे.
अरघची म्हणाले की, अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणुऊर्जा सुविधांना मोठं आणि गंभीर नुकसान झालं आहे. “सध्या युरेनियम समृद्धीची प्रक्रिया थांबलेली असली तरी, आम्ही आमचा कार्यक्रम थांबवणार नाही. युरेनियम समृद्धी ही आमच्या वैज्ञानिकांच्या प्रयत्नाचं प्रतीक आहे आणि आम्ही त्याग करू शकत नाही. हा आमच्या राष्ट्रीय अभिमानाचा विषय आहे,” असे ते म्हणाले.
यावर त्वरित प्रतिक्रिया देताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला की, “इराणने जर अणुउर्जा संदर्भात नवीन कोणतीही कृती केली, तर ती आमच्याकडून उद्ध्वस्त केली जाईल.” त्यांनी सांगितले की, जून महिन्यात अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांत इराणच्या तीन अणुउर्जा सुविधांचा संपूर्ण नाश झाला असून, त्या पुन्हा पूर्ववत करण्यासाठी अनेक वर्षे लागतील.
दरम्यान, युरोपियन देशांसोबत इराणच्या अणुकार्यक्रमावर चर्चा करण्यासाठी तुर्कीयेमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. शुक्रवारी, २५ जुलै रोजी ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीचे प्रतिनिधी इस्तंबूलमध्ये इराणी अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. या बैठकीला युरोपियन युनियनच्या परराष्ट्र धोरण प्रमुख काजा कल्लास देखील उपस्थित राहणार आहेत.
तेहरानने युरोपीय शक्तींवर 2015 मधील ऐतिहासिक अणुकरार भंग केल्याचा आरोप केला आहे. ही बैठक इस्रायलसोबत झालेल्या अलीकडील 12 दिवसांच्या संघर्षानंतरची पहिलीच बैठक असणार आहे, ज्यात अमेरिकेने इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर थेट हल्ले चढवले होते.
अहवालांनुसार, इराण अणुबॉम्ब विकसित करण्याच्या अंतिम टप्प्यावर आहे. इस्रायलकडून यावर तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली असून, त्यांना भीती आहे की, इराण भविष्यात अणुशस्त्रांचा वापर करून इस्रायलवर हल्ला करू शकतो.
ही संपूर्ण परिस्थिती आंतरराष्ट्रीय स्तरावर तणाव निर्माण करणारी असून, आगामी बैठकांमध्ये या मुद्द्यावर निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
