नवी दिल्ली : युवकासाठी एक नोकरीची खुशखबर आहे. अनेकांना केंद्र सरकारची नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी आली आहे. रेल्वे विभागाने तब्बल 1लाख 40 हजार 640 रिक्त पदांसाठी लवकरच परीक्षा घेणार असल्याचे घोषित केले आहे. येत्या डिसेंबरमध्ये परीक्षा होणार आहेत. लवकरच या परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर केले जाणार आहे. गेल्या 5 महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.
कोरोना महामारीमुळ देशावर आर्थिक संकट कोसळले असून गेल्या तिमाहीत जीडीपीत मोठी घट झाल्याचे दिसून आले. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मंत्रालय आणि संबंधित विभागांना अवास्तव असा खर्ज टाळण्याचे बजावले आहे. तसेच, मंत्रालयीन विभागातील कामकाजासाठी कागदाचा अनावश्यक वापरही बंद करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र, नोकर भरती थांबविण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे, केंद्र सरकारला विविध विभागातील जागांची भरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भारतीय रेल्वेकडून रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन पडल्याने या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. तसेच, पुढील तारखाही निश्चित करण्यात आल्या नव्हत्या, त्यातच लॉकडाऊनमुळे सरकारी नोकरी होणार की नाही? याबाबतही शंका निर्माण झाली होती. मात्र, रेल्वेने डिसेंबर महिन्यात परीक्षा घेण्यात येतील, असे सांगितले आहे. 15 डिसेंबर 2020 पासून रेल्वेच्या रिक्त जागांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे.
* देशभरातून 2.42 कोटी अर्ज
देशभरातील 1,40,640 जागांसाठी रेल्वेकडे तब्बल 2.42 कोटी अर्ज आले आहेत. या अर्जांची छाननीप्रक्रिया पूर्ण झाली असून ही परीक्षा संगणकीकृत असणार असल्याची माहिती आहे. रेल्वेकडे तीन श्रेणींसाठी हे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये एनटीपीसीसाठी (तांत्रिक नसलेल्या, गार्ड, लिपीक, क्लर्क) 35,208 जागा रिक्त आहेत. तर, 1663 जागा मंत्रालयीन स्तरावर आहेत. उर्वरीत 1,03,769 जागा ( ट्रॅकमन, सफाई, पॉईँटमन) यांसाठी आहेत. परीक्षा घेण्यासाठी विशेष सूचना व नियमावली तयार करण्यात आली आहे. कोरोना लॉकडाऊन, सामाजिक अंतर पालन करुनच या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे, गेल्या 5 महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.