मुंबई, 24 जुलै – सांगली जिल्ह्यातील तरुण कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्येनंतर विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. मात्र, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, हर्षल पाटील यांना सरकारकडून थेट कोणतेही कंत्राट देण्यात आलेले नव्हते.
अजित पवार म्हणाले, “आज सकाळी अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत माहिती घेतली असता असं समोर आलं की सरकारने दिलेल्या कंत्राटाचा मुख्य ठेकेदार वेगळा होता आणि त्याने हर्षल पाटील यांना सब-कॉन्ट्रॅक्टर म्हणून नेमले होते. त्यामुळे हर्षल पाटील यांचा सरकारशी थेट संबंध नव्हता.”
“बिलांचे पैसे थेट सब-कॉन्ट्रॅक्टरला देणे शक्य नाही” – अजित पवार
“कंत्राटदार सरकारकडे बिले पाठवतो आणि त्यानंतर शासन निधी वितरित करते. सब-कॉन्ट्रॅक्टरला थेट पैसे देण्याचे अधिकार सरकारकडे नसतात. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस यंत्रणा करत आहे,” असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
हर्षल पाटील यांचा आत्महत्येचा प्रकार
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी गावचे रहिवासी हर्षल पाटील यांनी जल जीवन मिशनअंतर्गत गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेचं काम पूर्ण केले होते. या कामासाठी त्यांनी स्वतःच्या नावावर ६५ लाखांचे कर्ज घेतले होते. सरकारकडून १.४० कोटी रुपयांची थकित बिले मिळत नसल्याने ते मानसिक तणावाखाली गेले आणि अखेर त्यांनी आत्महत्या केली.
पोलीस तपास सुरू
अजित पवार यांनी सांगितले की, “त्याने आत्महत्या करण्याआधी काही लिहून ठेवलं आहे का, कुणाला फोन केला होता का, मोबाईलमध्ये काही पुरावे आहेत का – याची चौकशी पोलीस यंत्रणा करत आहे.”
