मुंबई, २५ जुलै – “माझा पक्ष मला जी जबाबदारी देईल, ती पार पाडण्यासाठी मी नेहमीच तयार आहे,” अशी सूचक प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या नावाची मंत्रिपदासाठी चर्चा सुरू असतानाच त्यांनी हे वक्तव्य केले.
राजकीय वर्तुळात सध्या असं म्हटलं जात आहे की, भाजपमध्ये मंत्रिमंडळातील काही सदस्यांवर नाराजी असून काही मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. यामध्ये राहुल नार्वेकर यांना मंत्री करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर अध्यक्षपदासाठी सुधीर मुनगंटीवार यांचे नाव चर्चेत आहे.
या पार्श्वभूमीवर नार्वेकर म्हणाले, “माझ्या पक्षाने मला जी भूमिका दिली आहे, त्यातूनच मी महाराष्ट्रातील सामान्य माणसाला न्याय देऊ शकलो आहे. मी आमदार म्हणून काम करायला तयार आहे, मंत्री म्हणूनही. पक्ष जो निर्णय घेईल, तो माझ्यासाठी अंतिम आहे.”
विधानसभा अध्यक्ष म्हणून आपल्याला चांगले काम करण्याची संधी मिळाल्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, “१५२ लक्षवेधी प्रस्ताव एका अधिवेशनात मांडले गेले. विधानभवनाचे स्वरूप बदलले, दोन्ही सभागृहांचे डिजिटलीकरण सुरू आहे, आणि आम्ही पेपरलेस सभागृहाच्या दिशेने वाटचाल करत आहोत.”
नार्वेकर यांनी स्पष्ट केले की, “मी कोणतीही पदाची अपेक्षा ठेवत नाही. माझ्या पक्षाची इच्छा तीच माझी इच्छा आहे. विधानसभा अध्यक्ष, मंत्री किंवा आमदार – कोणत्याही भूमिकेत मी जनतेची सेवा करत राहीन.”
या वक्तव्यामुळे नार्वेकरांनी आगामी राजकीय बदलांबाबत स्पष्ट संकेत न देता पक्षनिष्ठा आणि जबाबदारी स्वीकारण्याची तयारी व्यक्त केली आहे.