छत्रपती संभाजीनगर, 28 जुलै :
म्हैसमाळ आणि वेरूळ येथे फिरण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा जोगेश्वरी धबधब्याजवळ दुर्दैवी मृत्यू झाला. चुलत भावाला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतलेल्या हर्षदीप तांगडे (रा. नागसेन नगर, उस्मानपुरा) याचा कुंडात बुडून मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, हर्षदीप आपल्या मित्रांसह वेरूळ लेणी परिसरातील जोगेश्वरी कुंडावर गेला होता. तिथे त्याचा चुलत भाऊ पाण्यात उतरला असताना अचानक बुडू लागला. हे पाहून हर्षदीप त्याला वाचवण्यासाठी पाण्यात शिरला. त्याने भावाला बाहेर काढले, मात्र स्वतः पोहू न येत असल्याने तो कुंडात बुडाला.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी आरडाओरड करत मदतीचा प्रयत्न केला. खुलताबाद पोलीस ठाण्यातील बीट जमादार राकेश आव्हाड आणि वेरूळ लेणी पोलीस चौकीतील शिपाई प्रमोद साळवी घटनास्थळी पोहोचले. शहरातील अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. परंतु सर्व प्रयत्नांनंतरही हर्षदीपचा मृतदेहच सापडला.
हर्षदीप हा कुटुंबातील एकुलता एक कमावता मुलगा होता. तो सध्या देवगिरी महाविद्यालयात पदवी शिक्षण घेत होता, अशी माहिती त्याच्या नातेवाइकांनी दिली. त्याच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
