बर्लिन, 28 जुलै :
जर्मनीमध्ये सिग्मरिंगेनहून उल्मकडे जाणारी एक प्रवासी रेल्वे जंगलाच्या मध्यभागातून जात असताना रुळावरून घसरल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून ५० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. ट्रेनमध्ये सुमारे १०० प्रवासी प्रवास करत होते.
जर्मन वेळेनुसार संध्याकाळी ६:१० वाजता रिडलिंगेन शहराजवळ ही दुर्घटना घडली. जर्मन रेल्वे ऑपरेटर ड्यूश बान (Deutsche Bahn) यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात ट्रेनचे दोन डबे रुळावरून घसरले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही; मात्र याबाबत तपास सुरू असून संपूर्ण परिसरात चौकशी सुरू आहे. घटनास्थळाच्या ४० किलोमीटर परिसरात रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे.
दरम्यान, दक्षिण जर्मनीत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि वादळामुळे भूस्खलनाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर अपघाताची कारणमीमांसा करताना हवामानाचा संबंध आहे का, हेही तपासले जात आहे.
अपघातानंतर अग्निशमन दल, वैद्यकीय पथके आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. काही जखमींना हेलिकॉप्टरद्वारे रुग्णालयात हलवण्यात आले असून अनेकांची प्रकृती गंभीर आहे.
जर्मन चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी सांगितले की, वाहतूक आणि गृह मंत्रालयाशी सतत संपर्कात असून बचावकार्यासाठी सर्वतोपरी मदत केली जात आहे.
या दुर्घटनेनंतर जर्मनीतील रेल्वे व्यवस्थेच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.