सातारा, 28 जुलै :
सातारा जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये दर्जेदार आणि सर्वसमावेशक शिक्षण देण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, भविष्यात सर्व शाळा सेमी इंग्लिश माध्यमात सुरू करण्यावर भर दिला जाणार आहे, अशी माहिती ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
खटाव तालुक्यातील शिरसवडी व पळशी येथील जिल्हा परिषद आदर्श शाळांमध्ये नवीन इमारतीच्या वर्ग खोल्यांचे भूमिपूजन रविवारी (28 जुलै) मंत्री गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. शिरसवडी येथे 7 तर पळशी येथे 9 नव्या वर्ग खोल्यांचे बांधकाम होणार आहे.
या वेळी माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, गटविकास अधिकारी योगेश कदम, गटशिक्षणाधिकारी सोनाली विभुते, तसेच अंकुश गोरे, अनिल माने, भरत जाधव, बंडा गोडसे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री गोरे म्हणाले की, “शाळांमध्ये दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रत्येक शिक्षकाने जबाबदारीने काम करावे. शासकीय शाळांनी खाजगी शाळांशी स्पर्धा करण्यासाठी सक्षम बनले पाहिजे. नागरिकांचा शासकीय शिक्षण व्यवस्थेवर विश्वास बसावा यासाठी प्रयत्नांची गरज आहे.”
शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी शिक्षकांना केले.
शाळेला शासनाच्या विविध योजनांतून आवश्यक ती आर्थिक मदत दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
माण तालुक्यात रस्ते, वीज, पाणी आणि शिक्षण या बाबींवर भर देण्यात येत असून विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
ते पुढे म्हणाले की, “गावकऱ्यांनी जर शाळांच्या उभारणीत सक्रिय सहभाग घेतला तर त्या शाळा आदर्श बनतात याचे अनेक उदाहरणे आज आपल्या समोर आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकलेले विद्यार्थी आज विविध क्षेत्रात उच्च पदांवर काम करत आहेत.”
“त्यामुळे आपल्या मुलांचे प्रवेश शासकीय शाळांमध्येच घ्यावेत,” असे आवाहनही त्यांनी पालकांना केले.