नवी दिल्ली, 28 जुलै – दिल्लीतील महाराष्ट्र सदन परिसरात उभारण्यात येणाऱ्या बहुउद्देशीय सांस्कृतिक भवनाचा प्रस्तावित आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आला. निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा आराखडा सादर करत प्रस्तावित सुविधांची सविस्तर माहिती दिली.
98 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी महाराष्ट्र शासनाने या सांस्कृतिक भवनाच्या उभारणीची घोषणा केली होती. सदर भवनात बहुउद्देशीय सभागृह, प्रशासकीय सेवांतील मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांसाठी निवासव्यवस्था, सुसज्ज ग्रंथालय, अभ्यासिका आणि इतर पूरक सुविधा असतील.
बैठकीत महाराष्ट्र सदनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची गरज, प्रशासकीय सुविधा आणि सध्या सुरू असलेल्या योजनांचेही सादरीकरण करण्यात आले. महाराष्ट्रातील ऋतूनिहाय फळांचे विक्री दालन, बचत गटांमार्फत तयार झालेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.
तसेच, दिल्लीत ‘महाराष्ट्र महोत्सव’ आयोजित करून लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याबाबतची योजना मांडण्यात आली असून यासाठी निधीची मागणीही करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यास सर्व बाबींवर सकारात्मक प्रतिसाद देत पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
या बैठकीस सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक मनीषा पिंगळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता किरण चौधरी, विद्युत विभागाचे आशुतोष द्विवेदी, माहिती अधिकारी अंजु निमसरकर कांबळे, तसेच महाराष्ट्र सदनाचे प्रभारी व्यवस्थापक प्रमोद कोलपते उपस्थित होते.