मुंबई, 28 जुलै – पुण्यातील उच्चभ्रू परिसरातील रेव्ह पार्टीवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात अटक करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या रोहिणी खडसे यांचे पती आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांच्या वैद्यकीय अहवालावरून आता वाद निर्माण झाला आहे. या अहवालात खेवलकर यांनी मद्यसेवन केल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र अंमली पदार्थांच्या चाचणी अहवालाबाबत होणाऱ्या विलंबावरून एकनाथ खडसे यांनी संशय व्यक्त केला आहे.
खडसे यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना विचारले की, “दारू सेवनाचा अहवाल इतक्या लवकर येतो, मग अंमली पदार्थांच्या तपासणीचा अहवाल मिळण्यास इतका वेळ का लागतो?”
त्यांनी यासंदर्भात मागील वर्षी घडलेल्या पोर्शे अपघात प्रकरणाची आठवण करून दिली, ज्या प्रकरणात ससून रुग्णालयावर नमुने बदलल्याचा आरोप झाला होता. “मागील इतिहास लक्षात घेता, खेवलकर यांच्या अंमली पदार्थांच्या चाचणी अहवालात फेरफार होणार नाही ना, अशी शंका उपस्थित होते,” असे खडसे म्हणाले.
डॉ. प्रांजल खेवलकर यांच्यासह अटक करण्यात आलेल्या इतर सात जणांमध्ये दोन महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे. पोलिसांनी या सर्वांची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली होती. आता अंमली पदार्थांच्या तपासणी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.