जालना, 28 जुलै – जालना शहरातील क्रीडा प्रबोधिनी वसतिगृहातील व्यवस्थापकाने चार अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलीस आणि शिक्षण विभागाच्या प्राथमिक चौकशीनंतर संबंधित व्यवस्थापक प्रमोद गुलाबराव खरात याला पोलिसांनी अटक केली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थिनी क्रीडा प्रशिक्षणासाठी या वसतिगृहात वास्तव्यास असतात. गेल्या काही काळात व्यवस्थापकाच्या वागणुकीबाबत गंभीर स्वरूपाच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर गट शिक्षणाधिकारी मनोज कोल्हे आणि महिला केंद्रप्रमुख सुजाता भालेराव यांनी दोन दिवसांपूर्वी वसतिगृहाला अचानक भेट दिली.
यावेळी अनेक मुलींनी व्यवस्थापक प्रमोद खरात याच्याविरोधात गंभीर तक्रारी केल्या. विद्यार्थिनींच्या सांगण्यानुसार, खरात हा त्यांना अश्लील हेतूने सीसीटीव्ही नसलेल्या खोल्यांमध्ये नेत असे आणि त्याठिकाणी छाती, पोट, पाठ व गळ्यावर हात फिरवत असे. काही विद्यार्थिनींनी या प्रकाराचे वर्णन अत्यंत धैर्याने अधिकाऱ्यांसमोर केले.
या तक्रारींची गंभीर दखल घेत गट शिक्षणाधिकाऱ्यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आरती जाधव करत असून, याबाबत अधिक माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली.