शिमला, 29 जुलै – हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात रविवारी सकाळी ढगफुटी झाल्याने भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून मदत व बचाव कार्य सुरू आहे.
ढगफुटीमुळे नद्या व नाले दुथडीने वाहत असून अचानक आलेल्या पुरामुळे जेल रोड परिसरात काही नागरिक अडकले. आपली वाहने बाहेर काढण्याच्या प्रयत्नात असताना हे नागरिक पुराच्या प्रवाहात सापडले. त्यापैकी दोघांचे मृतदेह शोधून काढण्यात आले आहेत.
दरम्यान, मंडी जिल्ह्यात सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. परिणामी, चंदीगड-मनाली आणि पठाणकोट-मंडी हे दोन्ही मुख्य राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आले आहेत.
-
चंदीगड-मनाली मार्गावर ४ मैल, ९ मैल, दवाडा, झालोगी आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्या आहेत.
-
पठाणकोट-मंडी मार्गावर पाथर ते मंडीदरम्यान अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे.
व्हिक्टोरिया पुलाजवळही भूस्खलन झाल्याचे प्रशासनाने सांगितले असून, सतत चालू असलेल्या पावसामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. जिल्हा प्रशासनाची पथके घटनास्थळी उपस्थित असून स्थानीय नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.