देवघर, 29 जुलै – झारखंडच्या देवघर जिल्ह्यात रविवारी पहाटे घडलेल्या भीषण रस्ते अपघातात 18 कावड यात्रेकरूंचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक भाविक गंभीर जखमी झाले आहेत.
हा अपघात मोहनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जामुनिया जंगलाजवळ पहाटे साडेचार वाजता झाला. कावड भाविकांनी भरलेली बस आणि गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाल्यामुळे ही दुर्घटना घडली.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, प्रशासन आणि आपत्कालीन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जखमींना देवघर येथील रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
भाविक बैद्यनाथ धामाच्या दिशेने कावड यात्रा करत असताना ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
देवघरचे खासदार निशिकांत दुबे यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त करत लिहिले, “माझ्या देवघर लोकसभा मतदारसंघात श्रावण महिन्यात कावड यात्रेदरम्यान बस-ट्रकच्या अपघातात १८ भाविकांचा मृत्यू झाला. बाबा वैद्यनाथ त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.”
पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी वाहनांची गती आणि अंधाराचा फटका संभाव्य कारणांमध्ये मानले जात आहे.