अकोला, 29 जुलै – खामगावमध्ये झालेल्या जातीय अनुषंगाने कथित मॉब लिंचिंग घटनेत जखमी झालेल्या रोहित पैठणकर यांची प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मंगळवारी अकोल्यातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर तीव्र टीका केली.
सपकाळ म्हणाले, “रोहित पैठणकर यांच्यावर जात-धर्म विचारून भ्याड हल्ला झाला, हा फक्त गुन्हा नसून सामाजिक सौहार्दावर हल्ला आहे. या घटनेमुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा पूर्णत: बोजवारा उडाल्याचे स्पष्ट झाले आहे.” त्यांनी या घटनेवर कठोर आणि तातडीची कारवाई होणे आवश्यक असल्याचेही नमूद केले.
यावेळी बोलताना सपकाळ यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीकेची झोड उठवत, “सर्व गृहमंत्र्यांमध्ये फडणवीस हे सर्वात लाचार व कमकुवत गृहमंत्री ठरले आहेत,” असे वक्तव्य केले.
घटनेचा तपशील:
मागील आठवड्यात खामगावमध्ये रोहित पैठणकर या युवकावर काही व्यक्तींनी “गाय चोर” असल्याचा आरोप करत जात आणि धर्म विचारून अमानुष मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला असून, त्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपींनी पीडिताला निर्वस्त्र करण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
सपकाळ म्हणाले की, “ही घटना मॉब लिंचिंगचाच प्रकार आहे. अशा प्रकारच्या घटनांनी राज्यात जातीय तणाव वाढू शकतो. महायुती सरकार गुन्हेगारीला खतपाणी घालत आहे,” असा आरोपही त्यांनी केला.
प्रशासनाची उदासीनता?
सपकाळ यांनी सांगितले की, “रोहित यांच्यावर अकोल्यात उपचार सुरू असून, आजवर बुलढाणा जिल्हा प्रशासनाकडून कोणताही अधिकारी भेटीस आलेला नाही. ना निवेदन घेण्यात आले, ना कुटुंबियांची विचारपूस करण्यात आली. ही गोष्ट सरकारच्या असंवेदनशीलतेचे प्रतिबिंब आहे.”