लंडन, 1 ऑगस्ट – भारत-इंग्लंड यांच्यात ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिल मोठा विक्रमवीर ठरला आहे. पहिल्या दिवशी तो फक्त २१ धावांवर बाद झाला, तरी या खेळीसह त्याने सुनील गावस्कर आणि सर गॅरी सोबर्स यांचे दशकांपूर्वीचे विक्रम मोडले.
कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय कर्णधार
या धावांसह गिलच्या चालू मालिकेतील धावसंख्या ७४३ इतकी झाली. तो आता कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय कर्णधार ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम सुनील गावस्कर यांच्या नावावर होता. गावस्करांनी १९७८ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ६ कसोट्यांत ७३२ धावा केल्या होत्या.
इंग्लंडमध्ये परदेशी कर्णधाराचा विक्रमही गाठला
शुभमन गिल इंग्लंडमधील कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा परदेशी कर्णधार ठरला आहे. त्याने वेस्ट इंडिजचा महान फलंदाज सर गॅरी सोबर्सचा विक्रम मागे टाकला. सोबर्स यांनी १९६६ मध्ये ७२२ धावा केल्या होत्या.
धावबाद होऊन परतला गिल
२८व्या षटकात गिल धावबाद झाला. गस अॅटकिन्सनने टाकलेल्या चेंडूवर गिलने बचावात्मक फटका मारून धाव घेण्याचा प्रयत्न केला, पण नॉन-स्ट्रायकर एंडवरील साई सुदर्शनने नकार दिला. गिल परतताना अॅटकिन्सनने चेंडू थेट स्टंपवर मारत त्याला बाद केले.
पावसाचा अडथळा
या कसोटीत पावसाने खेळात अडथळा आणला. नाणेफेकीला १० मिनिटांचा उशीर झाला. पहिला सत्र नियोजित वेळेपेक्षा आठ मिनिटे आधी थांबवावा लागला. दुसरे सत्रही उशिरा सुरू झाले आणि केवळ अर्धा तास खेळल्यानंतर पुन्हा पाऊस पडला. शेवटी तिसरे सत्र रात्री उशिरा सुरू करण्यात आले.