जम्मू-काश्मीर, 2 ऑगस्ट – जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असून, आतापर्यंत एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले आहे. उर्वरित दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.
चिनार कॉर्प्स, इंडियन आर्मीने सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, सर्च ऑपरेशन अद्याप सुरू आहे. शुक्रवारी संध्याकाळी उशिरा देवसर येथील अखल वनक्षेत्रात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर, जम्मू-काश्मीर पोलिसांचे विशेष ऑपरेशन ग्रुप आणि सीआरपीएफ जवानांनी संयुक्त शोध मोहीम सुरू केली.
दरम्यान, लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला, ज्याला जवानांनी प्रत्युत्तर दिले. अंधाराचा फायदा घेत काही दहशतवादी जंगलात पळून गेले, परंतु रात्री उशिरापर्यंत घेराव कडक करण्यात आला. शनिवारी सकाळी झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात यश आले.
गेल्या पाच दिवसांत खोऱ्यातील ही दुसरी मोठी कारवाई आहे. यापूर्वी श्रीनगरमधील दाचीगाम येथे झालेल्या कारवाईत लष्कर-ए-तय्यबाचा कमांडर आणि तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते.