देवघर, 2 ऑगस्ट – श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर देवघर येथील जगप्रसिद्ध बाबा बैद्यनाथ धाम येथे दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. शनिवारी पहाटे ४:०९ वाजता मंदिराचे द्वार उघडल्यानंतर जल अर्पण विधीला सुरुवात झाली. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण ४४ लाख १ हजार ८५ भाविकांनी बाबा बैद्यनाथाचे दर्शन घेऊन जल अर्पण केले आहे. देशभरातून तसेच परदेशातूनही हजारो भक्त येथे येत असून हे धार्मिक केंद्र श्रद्धेचे प्रमुख ठिकाण ठरत आहे.
१०५ किमीची पदयात्रा भाविकांची परंपरा
विशेषतः कावड यात्रेकरू बिहारमधील सुलतानगंज येथून गंगाजल घेऊन सुमारे १०५ किलोमीटरची पदयात्रा करत देवघरच्या बाबा धामपर्यंत येतात आणि जल अर्पण करतात. या संपूर्ण मार्गावर भक्तीमय वातावरण अनुभवायला मिळते.
सुरक्षेची कडेकोट व्यवस्था
जिल्हा पोलीस अधीक्षक अजीत पीटर डुंगडुंग यांनी सांगितले की, संपूर्ण देवघर शहर आणि जत्रा परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दंडाधिकारी, पोलीस दल, एटीएस, जिल्हा पोलीस, सीआरपीएफ आणि एनडीआरएफ यांची विविध पथके सतत गस्त घालत आहेत.
दानपात्रातून परकीय चलनाची नोंद
बाबा मंदिराच्या प्रांगणातील १८ दानपात्रे मंदिर प्रशासनाच्या देखरेखीखाली उघडण्यात आली. मोजणीनंतर त्यातून ₹१८,९२,०४७ इतकी रोख रक्कम प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे, यामध्ये नेपाळी चलन आणि अमेरिकन डॉलर्सचाही समावेश आहे.