मुंबई, 2 ऑगस्ट – शेतकरी क्रांती संघटना महाराष्ट्र राज्यने आज मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात अधिकृतपणे विलय केला. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब बिलेवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य आणि जिल्हा पातळीवरील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, “अनेकजण मला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांच्यासमोर प्रश्न उभा ठाकलाय की मी संपतो का? काही लोक गद्दार होतात, विकले जातात, पण माझे निष्ठावंत कार्यकर्ते विकले जात नाहीत. म्हणूनच माझे जुने सहकारी आजही माझ्यासोबत आहेत. जे गेले ते गेले, पण आज त्यांच्या खालील माणसं माझ्यासोबत आहेत.”
या प्रवेश सोहळ्यात खासदार अरविंद सावंत, प्रवक्त्या जयश्री शेळके, आमदार संजय देरकर, बुलडाण्याचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. विदर्भातील अनेक नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी मातोश्रीवर दाखल झाल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण होते.
वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वात ३ जिल्हा परिषद सदस्य आणि ४५ सरपंचांनीही शिवसेनेत प्रवेश केला. आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश ठाकरे गटासाठी मोठा बळ पुरवणारा ठरणार आहे. पश्चिम विदर्भात ठाकरे गटाचा पाय अधिक मजबूत करण्यास या प्रवेशामुळे मदत होणार आहे.
शेतकरी क्रांती संघटनेचे कार्य घाटमाथा व घाटाखालच्या भागात असून, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन बिलेवार यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला. त्यामुळे स्थानिक संघटनात्मक बळात लक्षणीय वाढ होणार आहे. बुलडाण्याचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत यांनी या भागात सेनेचे बळ वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.