नागपूर, 2 ऑगस्ट – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपेक्षित शैक्षणिक दर्जाची उंची मिळवत डॉ. आंबेडकर महाविद्यालयाने वंचित समाजासाठी शिक्षणाची दारे खुली करून जीवनात परिवर्तन घडवले. गेल्या ६० वर्षांच्या गौरवशाली परंपरेतून हे महाविद्यालय गुणवत्तेचा प्रवास पुढे नेत नवनवीन शिखरे गाठेल, असा विश्वास व्यक्त करत समाजपरिवर्तनाचे माध्यम म्हणून महाविद्यालय कार्यरत राहावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
दीक्षाभूमी स्मारक समिती संचालित डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या हीरकमहोत्सवी सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, डॉ. आंबेडकरांनी दिलेला समतेचा वारसा, संधीची समानता आणि स्वप्ने प्रत्यक्षात उतरविण्याची व्यवस्था पुढे नेणे आवश्यक आहे. धम्मपरिवर्तनाचे कार्य नागपुराच्या मातीत घडले. महाविद्यालयाने वंचितांसाठी शिक्षणाची दारे खुली करून त्यांचे जीवन बदलले. सुरुवातीला केवळ ५ वर्ग खोल्या, ५ शिक्षक आणि ३०० विद्यार्थी असलेले हे महाविद्यालय आज ६ हजार विद्यार्थी, ५० वर्ग खोल्या आणि ४० प्राध्यापकांसह शैक्षणिक उत्कृष्टतेच्या उच्च शिखरावर पोहोचले आहे.
विद्यार्थ्यांनी आंबेडकरांचे विचार अंगीकारावे – भूषण गवई
सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले की, स्वतःचा विकास साधतानाच समाजातील मागास घटकांना पुढे घेऊन जाणे हा डॉ. आंबेडकरांचा मूलभूत विचार आहे. विद्यार्थ्यांनी हे विचार अंगीकारून ध्येय साध्य करावे. महाविद्यालयाच्या उभारणीत दादासाहेब गायकवाड, दादासाहेब गवई, दादासाहेब कुंभारे, सदानंद फुलझेले यांचे मोलाचे योगदान आहे.
१९८१ मध्ये धम्मपरिवर्तनाच्या रौप्यमहोत्सव वर्षी मुंबईहून डॉ. आंबेडकरांच्या अस्थी नागपुरात आल्या तेव्हा शहरवासीयांनी उत्स्फूर्त स्वागत केले, हीच नागपूरच्या सर्वधर्मसमभावाची ओळख असल्याचे ते म्हणाले. त्यांनी कवी सुरेश भट यांच्या ‘भीम वंदना’चे वाचन करून भाषणाचा समारोप केला.