सोलापूर, 2 ऑगस्ट – खरीप हंगामातील शेतकरी स्तरावरील पीक पाहणी 1 ऑगस्टपासून सुरू झाली असून, ती 14 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. नैसर्गिक पीक नुकसान भरपाई, पीक विमा आणि इतर शासकीय लाभ मिळवण्यासाठी पीक पाहणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी वेळेत पीक पाहणी पूर्ण करण्याचे आवाहन माहिती तंत्रज्ञान कक्ष महसूल विभागाच्या संचालक सरिता नरके यांनी केले.
सहाय्यक स्तरावरील पीक पाहणी 15 सप्टेंबर ते 29 ऑक्टोबर दरम्यान होईल. मात्र, शेतकऱ्यांनी सहाय्यकांवर अवलंबून न राहता शक्य तितकी पीक पाहणी स्वतः करण्याचे सुचविण्यात आले आहे. पाहणी दरम्यान अडचणी आल्यास गावासाठी नेमलेले पीक पाहणी सहाय्यक मदतीसाठी उपलब्ध असतील.
ई-पीक पाहणी मोबाईल अॅप च्या साहाय्याने शेतकरी स्वतःच्या मोबाईलवरून 7/12 उताऱ्यावर नोंद असलेल्या पिकांची माहिती 1 ऑगस्टपासून नोंदवू शकतात. महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प 15 ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रात राबवला जात आहे. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार रब्बी हंगाम 2024 पासून पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्व्हे पद्धतीने सुरू करण्यात आली आहे. सध्या खरीप हंगामातील पीक पाहणी सुरू असून, यासाठी मोबाईल अॅपचे अद्ययावत व्हर्जन 4.0.0 गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.